मुंबई : मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना पालिका प्रशासनाकडून नोटीसा पाठवल्या जात आहेत. त्याअंतर्गत पालिका प्रशासनाने कलम २०३ अन्वये जप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. विहीत मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सदर मालमत्तेवर कलम २०४, २०५, २०६ अन्वये प्रथमतः मालमत्तेतील वस्तू जप्त करून त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. जप्त केलेल्या वस्तूंच्या लिलावातून कर वसूल झाला नाही तर, कलम २०६ अन्वये मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार असल्याचे या नोटीसांमध्ये म्हटले आहे.

मालमत्ता कर महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा करणे आवश्यक आहे. या कालावधीत कर न भरल्यास महानगरपालिकेकडून टप्पेनिहाय कारवाई सुरू करण्यात येते. महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क आणि संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी पाठपुरावा करतात. तरीही मालमत्ता कर न भरल्यास ‘डिमांड लेटर’ पाठवण्यात येते. यानंतरच्या पुढच्या टप्प्यात मालमत्ताधारकास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. त्यानंतर थकबाकीदारांची मालमत्ता जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाते. त्यानुसार निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तसेच आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावल्या जात आहेत.

हेही वाचा…सीएनजीच्या दरात २ रुपयांनी वाढ, आता किलो मागे ७७ रुपये मोजावे लागणार

काही मोठ्या थकबाकीधारकांकडून अद्याप कर भरणा करण्यात येत नसल्याने आाणि त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने कर निर्धारण व संकलन खात्याच्या वतीने जप्तीची नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दंड रकमेसह थकबाकी रकमेचा यात समावेश आहे. महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार लिलावाची कार्यवाही करण्यात येईल. यामुळे नोटीसप्राप्त मालमत्ताधारकांनी कारवाई टाळण्यासाठी तातडीने कर भरणा करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे.

नोटीस बजावलेल्या दहा मोठ्या मालमत्ताधारकांची यादी

१) मेसर्स एच. डी. आय. एल. लिमिटेड (वांद्रे पूर्व विभाग) – ३१ कोटी ६८ लाख ५१ हजार ३९८ रुपये

२) कमला मिल्स् लिमिटेड (वरळी, प्रभादेवी विभाग) – ३० कोटी ८२ लाख ६२ हजार १६६ रूपये

३) मेसर्स वाधवा डिझर्व्हह बिल्डर (मानखुर्द, देवनार) – २६ कोटी २४ लाख २९ हजार ६६५ रूपये

४) कमला मिल्स् लिमिटेड (वरळी, प्रभादेवी) – २३ कोटी ६४ लाख १९ हजार ८३४ रुपये

५) गोविंदराम ब्रदर्स लिमिटेड (अंधेरी पश्चिम विभाग) – २२ कोटी ३० लाख ६७ हजार ०५० रुपये

६) हीज होलीनेस सरदार ताहीर सैफुद्दिन साहिब (ग्रॅंटरोड) – १९ कोटी ९० लाख २४४ रुपये

७) गॅलेक्सी कॉर्पोरेशन (वांद्रे पश्चिम विभाग) – १८ कोटी ६६ लाख ८१ हजार ४९४ रुपये

८) सुरज हांडा, विष्णू प्रसाद (अंधेरी पश्चिम विभाग) – १८ कोटी १२ लाख १८ हजार ९१३ रुपये

९) अरिस्टों डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (देवनार, गोवंडी विभाग) – १६ कोटी ०५ लाख ९३ हजार ४१९ रुपये

१०) ओंकार डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड (वरळी, प्रभादेवी विभाग) – १४ कोटी ८७ लाख ५९ हजार ५८२ रूपये