मुंबई : विविध देशांतून आयात केलेल्या खाद्यपदार्थांचा दर्जा अन्न व सुरक्षा मानकांप्रमाणे असावा यासाठी आवश्यक ती सुधारणा करण्याच्या नोटिसा अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व गोदामे, शीतगृह मालकांवर बजावल्या आहेत. येत्या ४८ तासांत नियमावलीनुसार सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा या गोदामे, शीतगृहांतील मालजप्तीची कारवाई प्रशासनाकडून सुरू केली जाणार आहे.
गेल्या आठवड्यात अन्न व औषध प्रशासनाने नवी मुंबईतील शीतगृहांवर कारवाई करून २९ कोटींचा माल जप्त केला होता. आतापर्यंतही प्रशासनाने सर्वात मोठी कारवाई केली होती. केवळ कारवाई करणे हा आपला हेतू नसून आयात केलेल्या मालाचा दर्जा चांगला रहावा, यासाठी गोदामे, शीतगृहचालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार सुधारणा करावी यासाठी ही ७२ तासांची नोटिस देण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले.

सध्या परदेशातून आयात केलेले खाद्यपदार्थ वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र हे खाद्यपदार्थ आयात केल्यानंतर ते ज्या शीतगृहात ठेवले जातात तेथे काळजी घेत नसल्यामुळे त्या दर्जाबाबतच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.तुर्भे येथील मे. सावला फूड्स अँड कोल्ड स्टोरेजवर अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक छापा घातला. त्यावेळी या छाप्यात अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या. आयात केलेल्या खाद्यपदार्थाच्या दर्जाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या मालाचे ३५ नमुने चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याचा अहवाल या आठवड्यात मिळण्याची शक्यता असल्याचेही काळे यांनी सांगितले.

हेही वाचा : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थानने दर्शनासाठी शुल्क आकारणे गैर नाही; उच्च न्यायालयाचे मत

आयात केलेल्या खाद्यपदार्थांवर मूळ देशाच्या नावाचा उल्लेख नसणे, संबंधित खाद्यपदार्थ कधी पाठविण्यात आले तसेच या खाद्यपदार्थ वापरण्याची अंतिम मुदत काय आहे आदी प्रमुख बाबींबाबत निष्काळजीपणा आढळून आला. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार परवाने घेतले नसल्याची गंभीर बाबही आढळून आली. तपासणी अहवालात संबंधित खाद्यपदार्थ जीवितास घातक आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध थेट न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. आयातदार व शीतगृह मालक यांच्यामध्ये करारनामा झालेला नसतानाही बेकायदेशीररीत्या खाद्यपदार्थांचा साठा करण्यात आल्याची आणखी एक गंभीर बाब या छाप्यात उघड झाली होती.

Story img Loader