अलोक देशपांडे
मुंबई : प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या ४०० कर्मचाऱ्यांना विधिमंडळ सचिवालयाने नोटीस बजावत खुलासा मागितला आहे. हे कर्मचारी अ,ब.क व ड श्रेणीतील हे कर्मचारी आहेत.
२६ जानेवारीला सकाळी विधान भवनाच्या प्रांगणात विधान परिषद सभापती राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. तेव्हा अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती तुरळक होती. याबद्दल सभापती शिंदे यांनी सचिवांकडे विचारणा केली. यावरून विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांनी नोटीस बजावली आहे. या सर्वांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. २९ जानेवारीला त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदाच अशा स्वरूपाची नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्य विधिमंडळ नियमानुसार विधान परिषद सभापतींना विधान भवन परिसरातील घटनांबाबत प्रशासकीय तसेच आर्थिक विषयात अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. या कर्मचाऱ्यांना तीन दिवसांत नोटिशीला उत्तर द्यायचे आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा सभापतींनी दिला आहे. प्रजासत्ताक दिन सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आली होती. हे राष्ट्रीय कर्तव्य असून, उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने नोंद करायची होती. तरीही हे कर्मचारी गैरहजर राहिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.