मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांवर मर्यादा आल्या आहेत. अनेक प्रकल्पांना निधीची कमतरता भासत आहे. निधीवर निर्बंध घातले आहेत. अशा परिस्थितीत सत्तेत सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मतदारासंघातील कामे झाली तर त्यात राज्याचाच विकास आहे. त्यामुळे भापजबरोबर जाण्याचा अजित पवार यांचा निर्णय महाराष्ट्रहिताचा असल्याचा निर्वाळा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिला आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी बजाविलेल्या नोटिसा आणि राष्ट्रवादीचा मंत्रिमंडळातील सहभाग याचा काहीही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या विकासाचा ‘अजेंडा’ हाती घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला आहे. सत्तेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, बेरोजगार आदींना न्याय देण्यासाठी तसेच महिला-मुलींच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आगामी काळात आम्ही सत्तेचा उपयोग करू असे तटकरे यांनी स्पष्ट केले. भाजपबरोबर सत्तेत सामील झालेले आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्वाना जितेंद्र आव्हाड यांनी परत येण्याचे आवाहन केले होते. त्यावर आव्हाड हे कोण आहेत? असा सवाल करीत त्यांच्या आवाहनाला आम्ही महत्त्व द्यायचे काहीच कारण नाही, असे रोखठोक सांगितले.

अजित पवार हे राज्यातील एक सक्षम नेतृत्व आहे. त्यांच्यात मुख्यमंत्र पद सांभाळण्याची क्षमता आहे. ते योग्य वेळी मुख्यमंत्री होतील. मात्र पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी १६ आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू असल्याची चर्चा बिनबुडाची आहे. या चर्चेला काही अर्थ नाही. आपणांस ही माहिती आहे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यानी शिवसेनेच्या आमदारांना पाठवलेल्या नोटिसा ह्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा भाग आहे.