मुंबई : विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन व प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण आणि गतसत्रातील निकालासंबंधित माहिती वेळेवर न भरणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल, असा ईशारा मुंबई विद्यापीठाने दिला आहे. विविध विद्याशाखांच्या हिवाळी सत्रातील (द्वितीय सत्र – २०२३) परीक्षांचे गुण नोंदवण्यासाठी सोमवार, २० नोव्हेंबरपर्यंत महाविद्यालयांना मुदत देण्यात आली आहे.
महाविद्यालयांकडून अंतर्गत मूल्यमापनाचे, प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण वेळेवर नोंदवण्यात येत नसल्याने अंतिम निकालात ते अनेकदा दिसत नाहीत. त्यामुळे परीक्षेला हजर असतानाही विद्यार्थ्यांच्या निकालपत्रांमध्ये अनुत्तीर्ण असल्याचे दिसते. निकालातील गोंधळामुळे अनेकदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने महाविद्यालयांना वेळेवर गुण नोंदवण्याची तंबी दिली आहे. विविध विद्याशाखांअंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन व प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण आणि गतसत्रातील निकालासंबंधित माहिती महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे विद्यापीठाच्या https://mum.digitaluniversity.ac/ व https://muexam.mu.ac.in/ या संकेतस्थळावर सोमवार, २० नोव्हेंबरपर्यंत भरण्याची आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांना व शैक्षणिक संस्थांना केले आहे. दिलेल्या मुदतीत गुण न नोंदवणाऱ्या महाविद्यालयांकडून दंड आकारण्यात येणार आहे.