मुंबई : हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याप्रकरणी कुख्यात गुंड राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन याला ठोठावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगित केली. तसेच, त्याला जामीनही मंजूर केला. परंतु, काही खटल्यांमध्ये राजन शिक्षा भोगत आहे, तर काही खटल्यांमध्ये तो न्यायालयीन कोठडीत असल्याने या प्रकरणी जामीन मिळूनही तो तुरुंगातच राहणार आहे.

हॉटेल मालक जया शेट्टीच्या २००१ मधील हत्ये प्रकरणी सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात राजन याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. तसेच, अपील निकाली निघेपर्यंत जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने बुधवारी राजन याला सुनावण्यात आलेली जन्मठेपेची शिक्षा स्थगित केली व त्याला जामीन मंजूर केला. राजन याच्या मागणीला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) विरोध केला होता. विशेष सीबीआय न्यायालयाने ३० मे रोजी राजनसह अन्य तीन जणांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

हेही वाचा >>> टीव्ही पाहून पाठवला सलमानच्या धमकीचा संदेश; झारखंडमधून २४ वर्षीय तरूणाला अटक

खंडणी न मिळाल्याने हत्या

खटल्यादरम्यान, राजन याच्याकडून ५० लाख रूपयांच्या खंडणीसाठी शेट्टी यांना फोन करण्यात आला होता, मात्र त्यास शेट्टी यांनी नकार दिल्याची साक्ष त्यांच्या मुलांनी न्यायालयात दिली होती. परंतु, फिर्यादी पक्षाने आपला दावा सिद्ध केलेला नाही आणि न्यायालयात सादर केलेले पुरावे राजन याला त्याच्यावरील आरोपांत दोषी ठरवण्यासाठी पुरेसे नाहीत, असा दावा राजन याने केला आहे. दरम्यान, शेट्टी यांना हेमंत पुजारी या टोळीतील सदस्यांकडून खंडणीची धमकी देण्यात आली होती आणि खंडणीचे पैसे न दिल्याने त्यांची हत्या केल्याचे समोर आले होते.

दक्षिण मुंबईतील ‘गोल्डन क्राउन’ हॉटेलचे मालक असलेल्या शेट्टी याची त्यांच्या कार्यालयासमोर ४ मे २००१ रोजी दोन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेनंतर अजय सुरेश मोहिते उर्फ अजय सुरजभान श्रेष्ठ या आरोपीला अटक करण्यात आली होती. नेपाळी उर्फ चिकना याला दोन बंदुकांसह पकडण्यात आले. त्याने शेट्टी यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. तर सहआरोपी कुंदनसिंग रावत सुरुवातीला पळून जाण्यात यशस्वी झाला, पण नंतर त्यालाही अटक करण्यात आली.

खटल्याच्या समाप्तीपूर्वी रावत याचा मृत्यू झाला आणि अजय पॅरोलवर असताना चकमकीत मारला गेला.