हातभट्टीच्या दारूत अधिक नशा येण्यासाठी जीवघेण्या मिथेनॉलचा वापर उघड झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता भेसळमिश्रित ताडीकडेही लक्ष केंद्रित केले आहे. ताडीत क्लोरल हायड्रेट हे रसायन सर्रास मिसळले जात असून त्याची अधिक मात्रा आरोग्याला घातक असल्याने ताडीखोरांविरुद्ध कारवाई सुरू केली जाणार आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त शामसुंदर शिंदे यांनी त्यास दुजोरा दिला. मोठा नफा मिळविण्यासाठी ताडीमध्येही क्लोरल हायड्रेटसारखे रसायन मिसळले जाते. या भेसळीसाठी अन्य मार्गाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच प्रतिबंधात्मक कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात ताडीची सुमारे १२०० दुकाने आहेत. यापैकी फारच कमी दुकानांत प्रत्यक्षात ताडी विकली जाते. त्याऐवजी क्लोरेट हायड्रेटमिश्रित ताडी विकली जात आहे. या दुकानांत उत्पादन शुल्क विभागाकडून नमुने तपासलेही जातात, परंतु नमुना म्हणून नारळपाणी दिले जाते. प्रत्यक्षात क्लोरल हायड्रेटमिश्रित ताडीची तपासणीच होत नाही. मोठय़ा हप्तेबाजीमुळे आरोग्याला घातक असलेली ताडी विकली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच आता ही कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
वसई-नालासोपारा आदी परिसरांत ताडीचे प्रामुख्याने उत्पादन होते, परंतु मुळात तेथे ताडीची २०-२५ झाडे असतानाही हजारो लिटर्स ताडी निर्माण कशी होते, हा प्रश्न आहे.
कठोर कारवाई
* क्लोरल हायड्रेट हे दाताच्या वा किरकोळ शस्त्रक्रियांत अत्यंत अल्प मात्रेत वापरतात. त्याची अधिक मात्रा मात्र यकृत, हृदय, मूत्रपिंडाला घातक ठरू शकते.
* दुकानांतील ताडीत क्लोरल हायड्रेट आढळल्यास संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.