मंगल हनवते
मुंबई : वॉटर टॅक्सीतून अवघ्या ६० मिनिटांमध्ये बेलापूरहून गेट वे ऑफ इंडियाला पोहोचता यावे याची नवी मुंबईकर प्रतीक्षा करीत आहेत. पण आता नवी मुंबईकरांसाठी मुंबई सागरी मंडळाने वॉटर टॅक्सीची नवी सेवा सुरू केली आहे. नवी मुंबईकरांना अलिबागला केवळ सव्वातासात पोहचता यावे यासाठी बेलापूर – मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. शनिवारपासून या सेवेला सुरुवात होणार असून या वॉटर टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकिटापोटी ३०० आणि ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र ही सेवा केवळ शनिवार आणि रविवारसाठीच असणार आहे.
मुंबई – मांडवा अंतर अतिजलदगतीने पार करता यावे यासाठी १ नोव्हेंबरपासून वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून देशातील पहिल्या सर्वात मोठ्या, २०० प्रवासी क्षमतेची वॉटर टॅक्सी सेवेत दाखल झाली. या वॉटर टॅक्सीला हळूहळू पर्यटक/प्रवाशांकडून पसंती मिळत आहे. दरम्यान, ही वॉटर टॅक्सी अन्य मार्गांवरही चालवण्याचा निर्णय सागरी मंडळाने घेतला असून ही सेवा बेलापूर – गेट वे ऑफ इंडिया दरम्यान सुरू करण्यात येणार आहे. मात्र यात काही अडचणी येत असल्याने बेलापूर – गेट वे ऑफ दरम्यान वॉटर टॅक्सीतून प्रवास करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
हेही वाचा… मुंबई: मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे वाचले तरुणीचे प्राण
असे असले तरी आता सागरी मंडळाने दुसऱ्या एका मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बेलापूर – मांडवा असा हा मार्ग असून शनिवार, २६ नोव्हेंबरपासून या मार्गावर वॉटर टॅक्सी धावणार असल्याची माहिती नयनतारा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
हेही वाचा… मुंबईः ज्येष्ठ अभिनेते अनू कपूर यांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याला बिहारमधून अटक
बेलापूर जेट्टी येथून सकाळी ८ वाजता ही वॉटर टॅक्सी निघणार असून सकाळी ९.१५ वाजता मांडव्याला पोहचेल. तर संध्याकाळी ६ वाजता मांडव्यावरून वॉटर टॅक्सी निघेल आणि रात्री ७.४५ वाजता बेलापूरला पोहचेल. ही वॉटर टॅक्सी केवळ शनिवार आणि रविवार अशा सुट्टीच्या दिवशीच धावणार आहे. यासाठी ३०० आणि ४०० रुपये असे तिकीट असणार आहे. सध्या नवी मुंबईतून अलिबागला पोहचण्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. पण या वॉटर टॅक्सीमुळे बेलापूर – मांडवा अंतर केवळ सव्वातासात पार करता येणार आहे. त्यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे. दरम्यान, या सेवेसाठीच्या ऑनलाइन बुकिंगला बुधवारी सकाळपासून सुरुवात झाली आहे.