नाले, पर्जन्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी २१२ कोटींची खैरात
नालेसफाईमधील घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता पालिकेने नाले आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून या कामांची २१२ कोटी रुपयांची कंत्राटे स्थायी समितीने बुधवारी मंजूर केली. मात्र कामे सुरू होण्यापूर्वी व नंतर त्यांचे छायाचित्र घेण्याऐवजी तेथे सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याची अट स्थायी समिती सदस्यांनी घातली. त्यामुळे आता प्रशासनाला नाल्यांवर कामे सुरू असलेल्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवावे लागणार आहेत.
पश्चिम उपनगरातील काही नाले वळविणे, नाल्यांलगत संरक्षक भिंत उभारणे, पर्जन्य जलवाहिन्या, मोऱ्यांची दुरुस्ती, पेटीका नाल्याची आणि मोडकळीस आलेल्या नाल्याची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी कंत्राटदारांना २१२.०९ कोटी रुपयांची कामे देण्यात येणार आहेत. ही कामे सुरू करण्यापूर्वी आणि झाल्यानंतर छायाचित्रे काढण्यात येणार आहेत. मात्र छायाचित्रे काढण्यापेक्षा कामे सुरू होणाऱ्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी उपसूचना मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मांडली.
नाल्यांवर नेमक्या कोणत्या ठिकाणी कामे करण्यात येणार आहेत याचा प्रस्तावामध्ये उल्लेख नसल्याबद्दल काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी आक्षेप घेतला. नाल्यावर करण्यात येणाऱ्या प्रत्येक कामाची यादी प्रस्तावात समाविष्ट करावी, प्रत्येक कामावर दक्षता विभागामार्फत देखरेख ठेवली जावी आणि त्याचा अहवाल वेळोवेळी सादर करावा, अशी मागणी काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी या वेळी केली. नाल्यावर सीसी टीव्ही कॅमेरा बसविण्याच्या उपसूनचेसह सर्व प्रस्तावांना सुधार समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी मान्यता दिली. त्याचबरोबर प्रवीण छेडा यांचा मागणीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, असेही आदेश फणसे यांनी दिले.