सरकारी राजपत्रात नाव, वय व धर्म बदलासाठी जाहिरात देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा विचार असून त्यामुळे तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहण्याच्या त्रासातून लोकांची मुक्तता होणार आहे. या शिवाय शासकीय मुद्रण संचालनालयाकडून छापले जाणारे कायदे, अधिनियम, सरकारी प्रकाशने आदी ३२ सेवाही ऑनलाइन पुरविण्याचा विचार आहे. मुद्रण संचालनालयाने या संबंधात उद्योग विभागाकडे प्रस्ताव पाठविला असून मंत्रालय स्तरावर हिरवा कंदील मिळाल्यानंतर या सेवा ऑनलाइन मिळविता येतील.
संचालनालय दर आठवडय़ाला गुरुवारी सरकारी जाहिरात म्हणजे राजपत्र प्रकाशित करीत असते. ज्यांना आपल्या नावात, धर्मात किंवा वयात बदल करायचा आहे त्यांना या राजपत्रात जाहिरात द्यावी लागते. सध्या ही जाहिरात संचालनालयाच्या चर्नीरोड येथील मध्यवर्ती छपाई केंद्रात अथवा इतर विभागीय केंद्रांमध्ये अर्ज भरून दिल्यानंतरच देता येते. जाहिरातीसाठी अर्ज, शुल्क भरणे, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर राजपत्र मिळविणे ही सर्व प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक आहे. संचालनालयाच्या चर्नीरोड येथील केंद्रामध्ये गेल्या वर्षी तब्बल एक लाख ८६ व्यक्तींनी जाहिरातीसाठी अर्ज केला होता. विभागीय केंद्रातून येणारे अर्ज वेगळेच. ‘या सगळ्याचा अर्जदारांना त्रास तर होतोच. शिवाय केंद्राकडे ही गर्दी सामावून घेण्यासाठी पुरेशी जागा आणि कर्मचारी नसल्याने यंत्रणेवरही प्रचंड ताण येतो. म्हणून ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा विचार आहे,’ अशा शब्दांत मुद्रण संचालनालयाचे संचालक परशुराम गोसावी यांनी माहितीला दुजोरा दिला.
आपण दिलेली जाहिरात प्रसिद्ध झालेले राजपत्र हातात पडायला सध्या तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. पण, ऑनलाइन सेवेमुळे अर्जदारांना घर किंवा कार्यालयात ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर एका आठवडय़ाच्या आत जाहिरातीचे प्रिंटआऊट घेता येईल. त्यामुळे कागदाची प्रचंड मोठय़ा प्रमाणावर होणारी नासाडी थांबेल. कारण, आता गरज नसतानाही एकापेक्षा जास्त पानांचे राजपत्र घ्यावे लागते. त्याऐवजी आपले नाव ज्या कागदावर आहे त्याच कागदाची प्रिंटआऊट घेता येणे शक्य होईल. यासाठीचे शुल्क अर्जदारांना ते डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या मदतीने ऑनलाइन भरावे लागेल.
पुस्तकेही घरबसल्या
भाषा संचालनालय, साहित्य संस्कृती मंडळ, दर्शनिका विभाग, पुरातत्त्व विभाग आदींची पुस्तके, गॅझेट्स आदींच्या छपाईचे कामही मुद्रण संचालनालय करते. गॅझेट्स तर ऑनलाइन मिळतीलच. शिवाय पुस्तकांसाठी ऑनलाइन नोंदणी करून ती घरपोच मागविता येतील.
कायदे, अधिसूचना ऑनलाइन
राजपत्राशिवाय सरकारचे विविध कायदे, अधिसूचना, अध्यादेश, सरकारी नियुक्त्या, नोटिसा आदी मिळविण्यासाठीही संचालनालयाच्या छपाई केंद्रांमध्ये जावे लागते. पण, आता या सेवाही ऑनलाइन मिळविता येणे शक्य होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा