आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ओबीसी समाजाला संघटित करण्याचे प्रयत्न सार्वजनिक बांधकाम मंत्री  छगन भुजबळ यांनी सुरु केले आहेत. त्यासाठी त्यांनी गाव तिथे समता परिषदेची शाखा उघडण्याचा संकल्प केला आहे. त्याची सुरुवात पुणे जिल्ह्य़ातून करण्यात येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक घोटाळ्यांमुळे छगन भुजबळ हे टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. अलीकडेच चिखलीकर लाच प्रकरणाने भुजबळ अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणाशी आपला कोणताही व कसलाही सुतराम संबंध नसल्याचे भुजबळांनी सांगितले असले तरी, विरोधकांनी त्यांच्यावर तोफा डागायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत संघर्षांत भुजबळ केंद्रस्थानी असतात. तोंडावर निवडणुका आल्या असताना अशा प्रकारच्या वादात भुजबळ सापडल्याने आता त्यांच्याच नेतृत्वाखालील अखिल भारतीय समता परिषदेने मैदानात उडी घेतली आहे.
अलीकडे काहीशी थंडगार पडलेली समता परिषद पुन्हा जागी झाली आहे. परिषदेच्या वतीने आता गाव तिथे समता परिषदेची शाखा असे अभियान राबविण्यात येणार आहे. नाशिक येथे १३ मे रोजी छगन भुजबळ व खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थित या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. अर्थात हे अभियान पहिल्यांदा संपूर्ण पुणे जिल्ह्य़ात राबविण्यात येणार आहे. १५ ऑक्टोबर २०१३ पर्यंत सभासद नोंदणी करुन प्रत्येक गावात परिषदेची शाखा उघडण्यात येणार आहे, अशी माहिती समता परिषदेचे पदाधिकारी युवराज भुजबळ यांनी दिली. गाव तिथे समता परिषद या अभियानाच्या निमित्ताने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ओबीसी समाजाला पुन्हा संघटित करण्याचा भुजबळ यांचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा