जितेंद्रसिंग तोमर किंवा राज्यातील बबनराव लोणीकर यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून वाद निर्माण झाला असतानाच आता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विविध ठिकाणी पदवीच्या संदर्भात वेगवेगळी माहिती देऊन फसवणूक केल्याचा आरोप करीत लेखक संजीव खांडेकर आणि ‘आप’च्या प्रीती मेमन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बांधकाम खात्यातील घोटाळाप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच शिक्षणाच्या पात्रतेबद्दल वाद निर्माण झाल्याने भुजबळ यांची डोकेदुखी वाढली आहे.
भुजबळ यांनी शैक्षणिक पात्रतेबाबत वेगवेगळी माहिती दिली आहे. भुजबळ संस्थापक असलेल्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या वेबसाइटवर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल अभियंते, असा उल्लेख आहे. भुजबळ यांच्या वैयक्तिक वेबसाइटवर मेकॅनिकल अभियंता असा उल्लेख आहे. भुजबळ यांच्या ब्लॉगपोस्टवर व्ही.जे.टी.आय.मधून पदविका प्राप्त केल्याची माहिती दिसते. तर निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात एल.एम.ई.(आय) अशी माहिती सादर केली आहे. यामुळे भुजबळ यांचे नक्की शिक्षण कोणते, हा प्रश्न निर्माण होतो. भुजबळ यांनी त्याचा खुलासा करावा, अशी मागणी खांडेकर यांनी केली आहे. त्यांच्याकडे पदवी प्रमाणपत्र असल्यास आमची हरकत नाही, असे पत्रच खांडेकर आणि मेमन यांनी चेंबूर पोलिसांना दिले आहे.
नाहक वाद – भुजबळ
आपल्या शैक्षणिक पात्रतेवरून नाहक वाद निर्माण केला जात असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. आपले शिक्षण हे निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीप्रमाणे एल.एम.ई.(आय) म्हणजेच पार्ट-१ पर्यंत झाले आहे. कोणत्या वेबसाइटवर कोणी कोणती माहिती दिली याचा माझ्याशी काहीही संबंध नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. कोणत्याही चौकशीला आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा