‘ग्रंथ तुमच्या दारी’ला देश-विदेशात मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानने आता ‘माझे ग्रंथालय’ ही नवी योजना जाहीर केली असून तिची सुरुवात ठाणे शहरातून होणार आहे. या योजनेत वाचकांना प्रत्येकी २५ पुस्तकांचा संच दोन महिन्यांसाठी देण्यात येणार आहे. धावपळीच्या दिनचर्येमुळे ग्रंथालयात येऊ न शकणाऱ्या वाचकांच्या घरीच ग्रंथालय नेण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जाणार आहे.
पाच वर्षांपूर्वी प्रत्येकी शंभर पुस्तकांच्या ११ पेटय़ांद्वारे सुरू झालेल्या या योजनेत सध्या ५०० पुस्तक पेटय़ा आहेत. तब्बल एक कोटी रुपयांची ही पुस्तके देश-विदेशातील वाचकांपर्यंत पोहोचली आहेत. प्रत्येकी ३५ वाचकांच्या समूहास शंभर पुस्तकांची एक पेटी तीन महिन्यांसाठी दिली जाते. सध्या महाराष्ट्र कर्नाटक, गुजरात, दिल्लीबरोबरच दुबईतही या ग्रंथपेटय़ा पोहोचल्या आहेत. सहकारी बँका, खाजगी कंपन्या, तसेच काही दानशूर व्यक्तींनी दिलेल्या देणगीतून वाचकांना विनामूल्य ग्रंथपेटय़ा उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेमुळे विविध कारणांनी ग्रंथालयांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या वाचकांपर्यंत मराठी साहित्य पोहोचले आहे. गृहिणी, सेवानिवृत्त तसेच नोकरदार या योजनेचा मोठय़ा प्रमाणात लाभ घेत आहेत. मात्र अजूनही आपापल्या नोकरी-व्यवसायात व्यस्त असणारा असाही एक वर्ग आहे, की जो इच्छा असूनही पुस्तके वाचू शकत नाही. गटप्रमुखाकडे जाऊन पेटीतील पुस्तके घेण्यासाठीही त्याला वेळ नाही. त्यांच्यासाठी ‘माझे ग्रंथालय’ ही योजना असल्याची माहिती समन्वयक विनायक रानडे यांनी दिली. ‘माझे ग्रंथालय’ या योजनेत २५ पुस्तकांचा संच संबंधित व्यक्तीकडे दोन महिन्यांसाठी दिला जाईल. त्यानंतर संच बदलण्यात येईल, असे विनायक रानडे यांनी सांगितले.
‘ग्रंथ तुमच्या दारी’ला ठाण्यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. एकूण ५०० पैकी ५५ पेटय़ा ठाणे शहरात आहेत. त्यामुळेच पुढील महिन्यात १२ व्यक्तींद्वारे ‘माझे ग्रंथालय’ योजना कार्यान्वित केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. संपर्क- ९९२२२२५७७७.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा