दिवसेंदिवस वाढणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ांना आळा बसावा यासाठी सोनसाखळी चोरांवर मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्या’न्वये (मोक्का) कारवाई केली आहे. तूर्तास दोन सोनसाखळी चोरांना मोक्का लावण्यात आला असला तरी असे अनेक चोर रांगेत असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी सांगितले.
साजीद ऊर्फ बडा साजीद अब्दुल शेख आणि आदम मन्सुरी अशी मोक्का लावण्यात आलेल्या दोन साखळीचोरांची नावे आहेत. या दोघांना गेल्या डिसेंबर महिन्यांत माहिम येथे सोनसाखळी चोरीप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना मोक्का लावण्यात आल्यामुळे या चोरांवर ९० दिवसांऐवजी १८० दिवसांत पोलिसांना आरोपपत्र सादर करता येणार आहे. परिणामी या चोरांना जामीन मिळणे मुश्किल होईल आणि ते पुन्हा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात सक्रिय होणार नाहीत, हे यामागचे कारण असल्याचे सांगितले जाते.
या चोरांना दोन वर्षांपर्यंत तुरुंगातच राहावे लागले. कथित सोनसाखळी चोर दीर्घकाळ तुरुंगात राहिले तर सोनसाखळी चोरीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी सोनसाखळी चोरीचा गुन्हा ‘जबरी चोरी’ म्हणून नोंदविला जात होता. परंतु हे आरोपी ९० दिवसांत जामीनावर बाहेर येत होते. यापुढे सोनसाखळी चोरांना मोक्का लावला जाईल, असेही डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा