उपनगरी प्रवाशांच्या सोयीसाठी सरकत्या जिन्यांपाठोपाठ आता उद्वाहने (लिफ्ट) बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक मंजुरी मिळाली असून लवकर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून मध्य रेल्वेच्या दादर, सीएसटीसह अन्य सहा रेल्वे स्थानकांवर १३ व २० प्रवासी क्षमतेची उद्वाहने बसविण्यात येणार आहेत.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तीन आणि चारवर बसविण्यात आलेल्या सरकत्या जिन्याच्या उद्घाटनासाठी रेल्वे प्रशासन मुहूर्त शोधत आहे. आता उपनगरी रेल्वे स्थानकांवर उद्वाहन बसविण्यास मंजुरी देण्यात आली असून त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया सुरू झाल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अतुल राणे यांनी सांगितले.
दादर येथे सहा, सीएसटी आणि कल्याण येथे प्रत्येकी पाच, ठाणे येथे तीन, डोंबिवली, घाटकोपर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि लोणावळा येथे प्रत्येकी दोन उद्वाहने बसविण्यात येणार आहेत. या उद्वाहनांची क्षमता २० आणि १३ प्रवासी इतकी असून पहिल्या टप्प्यात दादर, कल्याण, सीएसटी आणि ठाणे येथे उद्वाहने बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या उद्वाहनांची घोषणा तत्कालिन रेल्वेमंत्री पनवकुमार बन्सल यांनी केली होती.