या वर्षांअखेपर्यंत पहिली ‘मेट्रो’ आणि ‘मोनोरेल’ मुंबईत धावू लागेल आणि मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाचे स्वप्न सत्यात उतरेल. रेल्वेच्या तिकिटांसाठी तासन्तास लावाव्या लागणाऱ्या रांगांचा त्रास ‘मेट्रो’ आणि ‘मोनो’चा प्रवास करताना मुंबईकरांना सहन करावा लागू नये याकरिता ‘सिमलेस स्मार्ट कार्ड’ आणण्याचा विचार ‘एमएमआरडीए’ करीत आहे. एवढेच नव्हे, तर बेस्ट आणि लोकल गाडय़ांनाही त्यात समाविष्ट करण्याची योजना आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत मुंबईकर एका ‘स्मार्ट कार्ड’च्या माध्यमातून या चारपैकी कुठलाही प्रवास करू शकणार आहेत.  
‘एमएमआरडीए’ने ‘मेट्रो’ आणि ‘मोनो’ची भाडेवसुली यंत्रचलित पद्धतीने करण्यासाठी व्यवस्थाही तैनात केली आहे. एका स्पॅनिश कंपनीकडे त्याचे काम देण्यात आले असून कंपनी त्यासाठी विशेष अशी व्यवस्था सज्ज करीत आहे. त्याचप्रमाणे ही व्यवस्था ‘मेट्रो’ आणि ‘मोनो’ दोन्हीसाठी एकत्रित वापरता येऊ शकेल या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. विविध प्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी एकच ‘स्मार्ट कार्ड’ वापरात आणण्याबाबत केंद्र सरकारकडून योजना आखण्यात येत आहे. परंतु त्याला अद्याप बराच अवधी आहे. त्यामुळे ‘मेट्रो’ आणि ‘मोनो’च्या निमित्ताने दोन्ही सेवांसाठी एकच ‘स्मार्ट कार्ड’ वापरात आणण्याचा आणि मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ‘एमएमआरडीए’कडून सांगण्यात आले. वास्तविक तीन वर्षांपूर्वी ही संकल्पना अस्तित्वात आली. परंतु केंद्र सरकारने केलेल्या घोषणेमुळे ती प्रलंबित होती. आता मात्र ‘एमएमआरडीए’ने ती अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना केवळ ‘मेट्रो’ आणि ‘मोनो’ पुरती मर्यादित न ठेवता त्यात बेस्ट आणि रेल्वेलाही समाविष्ट करण्याबाबत विचार सुरू आहे.
‘बेस्ट’तर्फे तर त्यासाठी हिरवा कंदीलही दाखविण्यात आला आहे. त्यामुळे ‘मेट्रो’ आणि ‘मोनो’ मुंबईत धावण्यापूर्वी ‘स्मार्ट कार्ड’ची ही व्यवस्था सज्ज करण्याचा एमएमआरडीचा प्रयत्न आहे. या ‘स्मार्ट कार्ड’मुळे प्रवाशांना तिकिटासाठी तासनतास रांगांमध्ये उभे राहावे लागणार नाही. तर फलाटावर दाखल होतेवेळी प्रवेशदारापाशी हे कार्ड ‘स्वाईप’ करावे लागणार आहे.

Story img Loader