लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : येत्या गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरू होत आहे. या मुहूर्तावर राज्यामध्ये परिवहन विभागामार्फत नोंदणी झालेल्या प्रत्येक व्यावसायिक वाहनावरील सामाजिक संदेश हे मराठीत असले पाहिजेत, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्याची मराठी ही अधिकृत राज्य भाषा आहे. महाराष्ट्रातील नागरिक हे प्रामुख्याने मराठी भाषिक आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषेचे संवर्धन करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु, राज्यात नोंदणी असलेल्या अनेक व्यावसायिक वाहनांवर सामाजिक संदेश, जाहिरात आणि प्रबोधनात्मक माहिती हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये लिहीलेले असतात. त्यामुळे मराठी भाषेचा प्रचार व प्रसारावर बंधने येतात.
सामाजिक संदेश, जाहिरात व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत प्रदर्शित केल्यास महाराष्ट्रातील जनतेला अधिक उपयुक्त माहिती मिळेल आणि मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होईल. तसेच मराठी भाषेचा योग्य सन्मान राखला जाईल. त्यासाठी येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व व्यावसायिक वाहनांवरील सामाजिक संदेश, तसेच इतर महत्त्वाच्या जाहिराती व प्रबोधनात्मक माहिती मराठी भाषेत लिहिण्याची अंमलबजावणी सुरू करावी, असे निर्देश परिवहन आयुक्त यांना सरनाईक यांनी दिले आहेत.
एसटीच्या जमिनी विकसित करण्याची सूचना
एसटी महामंडळाची राज्यभरात ८४२ ठिकाणी १,३६० हेक्टर जमीन आहे. त्याचे शहरी, निम-शहरी आणि ग्रामीण असे वर्गीकरण केले आहे. राज्यातील बस स्थानक अत्याधुनिक सेवा – सुविधायुक्त करण्यासाठी ‘बांधा वापरा हस्तांतरित करा’ या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ किंवा खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर या जमिनी विकसित करून तेथे एसटी महामंडळाला आवश्यक असलेली बस स्थानके, आगार आणि आस्थापना कार्यालय संबंधित विकासकाकडून बांधून घेणे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी किमान १०० खाटांचे अद्यावत रुग्णालय, विद्युत बस चार्जिंग स्थानक, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सौरऊर्जा प्रकल्पासारखे पर्यावरण पूरक प्रकल्प उभारण्याचे नियोजित आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी व अंबोली, या बसस्थानकांचा विकास, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानकावर प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत.