गेले अनेक दिवस चर्चेत असलेले महापालिकेचे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन पुढच्या आठवडय़ापासून मुंबईकरांना वापरता येणार आहे. सुरुवातीला पाणीदेयके भरण्याची सोय देण्यात येणार असून त्यानंतर मिळकत कर, अनुज्ञापन विभाग यांची देयके भरण्याची तसेच  नोव्हेंबर महिन्यात तक्रार नोंदणीची सुविधाही या अ‍ॅपमधून उपलब्ध होईल.
एमसीजीएम २४ बाय ७ हे अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलवर डाउनलोड करता येईल. सीएनएन क्रमांक नोंदवल्यावर ग्राहकाला देयकाची रक्कम दिसू शकेल. त्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेटबँकिंग तसेच आयएमपीएससारख्या पर्यायांचा वापर करून शुल्क भरता येईल. हे शुल्क भरण्यासाठी संबंधित सुविधा देणाऱ्या कंपन्यांकडून साधारण एक टक्का अतिरिक्त शुल्क लावले जाईल. देयकाचे शुल्क भरल्यानंतर लघुसंदेशाद्वारे पोचपावती मिळणार आहे. मिळकत कर तसेच अनुज्ञापन विभागातील देयके महिन्याभरानंतर भरता येतील, अशी माहिती महापौर सुनिल प्रभू यांनी दिली. पालिकेच्या ग्राहक सुविधा केंद्रासह सायबर सुविधा केंद्रांमध्ये पेमेंट गेट वे तसेच पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर पैसे भरण्याच्या तसेच तक्रारी करण्याच्या सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
तक्रार निवारण मात्र लांबणीवर
मोबाइल अ‍ॅप्लिकेशनमध्ये तक्रार नोंदवण्याची सोय पुरवणे तांत्रिकदृष्टय़ा अधिक सोपे असते. आर्थिक बाबींशी निगडीत नसल्याने परवानगीचे जंजाळही नसते. मात्र पालिकेच्या अ‍ॅप्समध्ये ही सुविधा सर्वात शेवटी, नोव्हेंबर महिन्यात पुरवण्यात येणार आहे. पावसाळ्यात दुषित पाणी, खड्डे, तुंबलेली गटारे यांच्या तक्रारींची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढते. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी स्वतच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेण्यास सत्ताधारी तयार नसल्याने तक्रारी करण्याची संधी सर्वसामान्यांना नोव्हेंबरनंतर मिळणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.