प्रपंच करावा नेटका

डोंबिवलीतील ३५ वर्षीय महेश केळकर हे व्यावसायिक छायाचित्रकार आहेत. लग्नसमारंभ, साखरपुडा, वाढदिवस अशा खासगी कार्यक्रमांमध्ये छायाचित्रण करून केळकर आपला चरितार्थ चालवतात. तर त्यांच्या पत्नी अंजली या गृहिणी आहेत. याशिवाय घरात केळकर यांची मुलगी व आई-वडीलदेखील वास्तव्याला आहेत. वर्षभरात त्यांना सरासरी ४.५ ते ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते. मात्र, व्यवसाय निश्चित उत्पन्नाचा नसल्याने कार्यक्रमांच्या छायाचित्रणातून मिळणाऱ्या बिदागीतून शिल्लक ठेवून केळकर यांना कुटुंबाचा मासिक खर्च चालवावा लागतो. लग्नाच्या मोसमात मिळालेल्या उत्पन्नातून ते पुढील सहा महिन्यांच्या खर्चाची ते बेगमी करून ठेवतात. पाच जणांच्या कुटुंबाचा दूध, किराणा, भाजीपाला, अन्य घरखर्च तसेच विम्याचे हप्ते असा एकूण २० ते २२ हजार रुपये मासिक खर्च आहे. छायाचित्रकारासाठी कॅमेरा हे महत्त्वाचे उपकरण आहे. कॅमेऱ्याच्या तंत्रज्ञानात झपाटय़ाने बदल होत असल्याने बदलत्या तंत्रज्ञानानुसार छायाचित्रणाचा उत्तम दर्जा राखण्यासाठी महेश यांना दर दोन-तीन वर्षांनी नवीन कॅमेरा खरेदी करावा लागतो. सध्या त्यांच्याकडे कॅमेऱ्याचे दोन संच आहेत. मात्र येत्या वर्षभरात त्यांना नवीन कॅमेरा खरेदी करायचा आहे.

घरभाडय़ावरील करकपात मर्यादेत ६० हजारांपर्यंत वाढ

घरभाडय़ावर करकपातीची मर्यादा सध्याच्या २४ हजार रुपयांवरून ६० हजार रुपयांपर्यंत वाढवत भाडेकरू असलेल्या वैयक्तिक करदात्यांना दिलासा दिला आहे. कलम ८० जीजीनुसार होणाऱ्या घरभाडे कपातीची मर्यादा वार्षिक २४ हजार रुपयांवरून  ६० हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे.  पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांना ३५ लाख रुपयांच्या कर्जावर ५० हजार रुपयांच्या अतिरिक्त करसवलत मिळणार आहे. ५० लाख रुपयांहून कमी किमतीच्या घरांसाठी ही सवलत मिळणार आहे. कलम ८७ अ अन्वये मिळणाऱ्या करसवलतीची मर्यादा २ हजार रुपयांवरून ५ हजार रुपये करण्यात आली आहे. यामुळे ५ लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या वैयक्तिक करदात्यांना करदायित्वात ३ हजार रुपयांचा फायदा होईल.

अर्थसंकल्पाचा परिणाम

सेवा करात वाढ झाल्याने केळकर कुटुंबीयांच्या घरखर्चात आपसूकच ८ ते १० टक्क्यांची वाढ होणार आहे. निश्चित मासिक उत्पन्न नसल्याने हा खर्च भागवण्यासाठी केळकर यांना अधिक तरतूद करावी लागणार आहे.

कॅमेरा उत्पादकाकडून दिली जाणारी कॅमेऱ्याची निगराणी व फोटो छपाई या सेवा सेवाकराच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.  साहजिकच व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाण स्थिर राखण्यासाठी त्यांना आपल्या छायाचित्रण सेवेचा दर वाढवावा लागेल.

वार्षिक उत्पन्न ४.५ ते ५ लाख

दरमहा खर्च २०-२२ हजार रुपये

Story img Loader