शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवरच आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “ मी काँग्रेससोबत गेलो नाही, भाजपाने मला ढकललं आहे. हे पुन्हा यासाठी सांगू इच्छितो की तुमच्या मनात गैरसमज राहू नये. २०१४ मध्ये मी युती तोडली नव्हती, भाजपाने युती तोडली होती. तेव्हाही मी हिंदूच होतो ना? आजही हिंदूच आहे. त्यावेळी तुम्ही युती तोडली होती. नंतर तुम्हाला जेव्हा समजलं, गरज पडली की अरे शिवसेना तर सोबत लागेल. त्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी युती तोडली होती. मोठी अडचण होती कारण, २८ जागांवर मी उमेदवार कुठून आणणार होतो? तरीही आम्ही लढलो, एकटेच लढलो आम्हाला ६३ जागा मिळाल्या होत्या. भाजपाला असं वाटलं होतं की ते एकट्याच्या जीवावर सत्ता सांभाळतील. नाही सांभाळू शकले आमची मदत घ्यावी लागली. त्यानंतर अमित शाह घरी आले होते आणि हेतर मी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात, मी माझ्या आई आणि वडिलांची शपथ घेऊन सांगितलं होतं की हे खऱंय की त्यांनी मला एक वचन दिलं होतं, आणि मी ते यासाठी मागितलं होतं कारण मी माझ्या वडिलांना वचन दिलं होतं की एकदिवस मी तुमच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवून दाखवेल. ते माझं वचन आजही कायम आहे. त्यावेळी अमित शाह ठीक आहे असं म्हणाले होते. मात्र त्या ठीक आहे नंतर जे काय घडलं ते तुम्ही पाहत आहात.”

हेही वाचा – “ज्यांनी माझ्या पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हिसकावला, त्यांना माझं आव्हान आहे की…” उद्धव ठाकरेंचं जाहीर विधान!

याचबरोबर “ आज जसे आमचे काही लोक गळ्यात पट्टा बांधून गेले आहेत त्यांच्याकडे. हे तर माझ्या वडिलांनी कधी शिकवलं नाही, की कुणाची गुलामी करा. माझ्या वडिलांनी शिकवलंय अन्यायाविरोधात लढाई करा. मी लढवय्या बापाचा लढवय्या मुलगा आहे. मी कधीच खोटं बोलणार नाही. खोटं बोलणं माझ्या रक्तात नाही. म्हणूच मी म्हटलं असं असेल तर मी सोडतो. त्यावेळी तर हे सांगण्यात आलं होतं की, तुम्ही निवडून आला आहात लक्षात ठेवा मोदींचा चेहरा तुम्ही वापरला आहात. त्यावेळी तर युती होती. आमच्या पोस्टरवर मोदींचा चेहरा होता, त्यांच्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे यांचा चेहरा होता. काल मी सांगितलं की एक काळ असा नक्कीच होता की मोदींच्या सभेत मोदींचा मुखवटा घालून येत होते, मात्र आता दिवस बदलले आहेत, आता मोदींना बाळासाहेब ठाकरेंचा मुखवटा घालून महाराष्ट्रात यावं लागतं.” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा – संजय राऊत हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंची चाटुगिरी करणारा माणूस – खासदार प्रतापराव जाधवांचे टीकास्र!

याशिवाय “ जे काय सुरू आहे ते तुम्हाला पसंत आहे का? ही लोकशाही आहे का? लढायचं असेल तर मैदानात लढा. तुम्हाला जे काही म्हणायं आहे ते म्हणा, आम्हाला जे काय म्हणायचं ते आम्ही म्हणू जनता निर्णय करेल. कारण, तीच सर्वात उच्च न्यायालय आहे. जनतेला निर्णय घेऊ द्या, हीच तर लोकशाही आहे. मात्र यांना लोकशाही मान्य नाही. सर्व यंत्रणांना लांडग्याप्रमाणे आपल्यावर सोडतात. मी कुत्रा यामुळे म्हणत नाही कारण मला कुत्रा खूप आवडतो कारण तो इमानदार असतो. लांडगा हा लांडगाच असतो आणि लबाड असतो.” असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now prime minister modi has to wear the mask of balasaheb thackeray and come to maharashtra uddhav thackeray msr