काळाप्रमाणे बदललेली मानसिकता, दुभंगलेली घरे, संपलेला सुसंवाद, शाळेतून हद्दपार झालेली छडी, परीक्षा आणि शिस्तीचा अभाव, एकत्र कुटुंबपद्धतीचा ऱ्हास या सर्वांचा परिणाम उमलत्या पिढीवर होत असून त्याचे दुष्परिणाम आपण आता छेडछाड, हत्या, व्यसने या माध्यमातून पाहत आहोत. हे सगळे चित्र बदलण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पोलिसांच्या भूमिकेत येण्याची गरज आहे, असे मत पोलिसांच्या कल्याण परिमंडळाने आयोजित केलेल्या परिसंवादात मंगळवारी व्यक्त करण्यात आले.
डोंबिवली परिसरात छेडछाडीच्या वाढत्या गुन्ह्य़ांमुळे या भागातील सुशिक्षित समाजाचे प्रबोधन करण्यासाठी पोलिसांनी सावळाराम महाराज क्रीडासंकुलात ‘चला, मुलांना गुन्हेगारीपासून वाचवू या’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी, शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र बाजपेयी, कायदेतज्ज्ञ शिरीष देशपांडे, मानसोपचारतज्ज्ञ श्रीरंग श्रीखंडे, पोलीस अधिकारी बिपीनकुमार सिंह, भुजंगराव शिंदे, पराग मणेर, राजन घुले, महापौर वैजयंती गुजर उपस्थित होते.
डोंबिवली यापूर्वी दोन ते तीन लाखांचे शहर आता १४ लाखांच्या लोकसंख्येपर्यंत पोहचले आहे. एक सुशिक्षित वर्ग येथे राहातो. पण या शहरातील गुन्हेगारीमध्ये वीस वर्षांच्या तुलनेत सहा पटीने वाढ झाली आहे. हे पोलीस रोखू शकत नाहीत. पोलीस बळ कमी आहे. हे सर्व रोखण्यासाठी समाजानेच पोलिसांच्या भूमिकेत येणे गरजेचे आहे, असे मत रघुवंशी यांनी व्यक्त केले. फेसबुकसारख्या सामाजिक साइटवर काम करताना आपले सामाजिक, राजकीय भान, त्याचे दुष्परिणाम याची जाणीव ठेवून वागले पाहिजे, असे मत अ‍ॅड. देशपांडे यांनी व्यक्त केले.
डॉ. श्रीखंडे, प्रा. बाजपेयी, बिपीनकुमार सिंह, महापौर गुजर यांनीही आपली मते व्यक्त केली. यावेळी संतोष विच्छीवर प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या जयंतीलाल गडा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला आठलेकर यांनी केले.        

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा