प्रवाशांना भाडे नाकारण्याची रिक्षा-टॅक्सी चालकांची सवय भाडेवाढीनंतरही कायम राहिली आहे. दिवसेंदिवस भाडे नाकारण्याच्या तक्रारी प्रवाशांकडून होतच असून त्यावर अद्याप कोणताही कायमस्वरूपी उपाय निघाला नसला तरी परिवहन विभागाने आता रिक्षा-टॅक्सींवर लांबून दिसणारा फलक (इंडिकेटर) लावण्याची योजना आखली आहे. प्रथम टॅक्सींवर आणि नंतर रिक्षांवर हे टॉप लावण्यात येणार आहेत. या ‘टॅक्सी टॉप’ योजनेबाबत परिवहन विभागाने जनतेकडून सूचना मागविल्या असून भाडे नाकारण्याच्या तक्रारी कमी होण्यासाठी हे टॉप उपयुक्त ठरतील, असा दावा परिवहन विभागाने केला आहे.
डॉ. हकीम समितीने भाडेवाढीबाबत केलेल्या शिफारशींमध्ये सर्व टॅक्सी-रिक्षांवर इंडिकेटर टॉप लावण्याबाबत सूचना केली होती. त्यांनतर शहरातील अनेक फ्लीट टॅक्सींवर अशा प्रकारचे टॉप दिसू लागले होते. मात्र काळ्या-पिवळ्या किंवा कूल कॅबवर हे टॉप लावण्यात आलेले नव्हते. आता भाडे नाकारण्यावर एक उपाय या नावाखाली हे टॉप लावण्यात येणार आहेत. टॅक्सी आणि रिक्षांवर साधारणपणे १०० ते १५० मीटर अंतरावरून दिसू शकेल असा एक फलक (इंडिकेटर टॉप) लावण्यात येणार आहे. टॅक्सींमध्ये या टॉपवर अक्षरे असतील तर रिक्षांमध्ये खुणा असतील. टॅक्सीवर असलेल्या टॉपवर केशरी रंगामध्ये ‘हायर्ड’ (भाडे घेतले आहे), हिरव्या रंगामध्ये ‘फॉर हायर’ (भाडे हवे आहे) तर पांढऱ्या रंगामध्ये ‘ऑफ डय़ुटी’ (टॅक्सी चालकाला भाडे नको आहे) असे असणार आहे. रिक्षांमध्ये ‘फुली’ किंवा ‘शून्य’ अशा खुणांनी रिक्षाची स्थिती दाखविण्यात येईल. प्रथम हे टॉप टॅक्सींवर व नंतर रिक्षांवर हे टॉप बसविण्यात येतील. परिवहन विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, हे फलक लांबूनच प्रवाशांना दिसल्यामुळे एखादी टॅक्सी किंवा रिक्षा येणार आहे किंवा नाही याचा अंदाज त्यांना येईल आणि मग भाडे नाकारण्याचा प्रश्नच येणार नाही.
इंडिकेटर टॉप लावणारे महाराष्ट्र राज्य देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या टॅक्सी टॉपबाबत शिफारशी, हरकती १५ दिवसांमध्ये परिवहन विभागाची विभागीय कार्यालये किंवा dycommr.enfl@gmail.comn या संकेतस्थळावर किंवा ०२२-२६४१४९०१ या क्रमांकावर पाठवाव्यात, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. या टॉप बाबतची तांत्रिक माहिती मोटार वाहन विभागाच्या http://www.mahatrans
com.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
आता टॅक्सीटॉप!
प्रवाशांना भाडे नाकारण्याची रिक्षा-टॅक्सी चालकांची सवय भाडेवाढीनंतरही कायम राहिली आहे. दिवसेंदिवस भाडे नाकारण्याच्या तक्रारी प्रवाशांकडून होतच असून त्यावर अद्याप कोणताही कायमस्वरूपी उपाय निघाला नसला तरी परिवहन विभागाने आता रिक्षा-टॅक्सींवर लांबून दिसणारा फलक (इंडिकेटर) लावण्याची योजना आखली आहे.
First published on: 14-01-2013 at 02:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now taxi top