शिक्षणेतर कामे, प्रशिक्षणाच्या माऱ्यामुळे शिक्षकच शाळाबा
खिचडी शिजवणे, भाकऱ्या थापणे, गावातील लोकांची मोजणी करणे, मतदान केंद्राची व्यवस्था पाहणे या शिक्षकांच्या कामांत आता आणखी एका कामाची भर राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे पडली आहे. त्यांच्यावर गावातील पाणवठे शोधण्याचे काम सोपविण्यात आले आहे! दुष्काळग्रस्त गावातील पाणवठे शोधून गावाचा पाण्याचा साठा किती दिवस पुरेल हे शोधण्याचे कामही शिक्षकांना करावे लागत आहे!! या कामासाठी त्यांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे!!! शिक्षणेतर कामे आणि प्रशिक्षणाचा मारा यामुळे शिक्षकांचा वावर आता शाळेपेक्षा शाळेबाहेरच जास्त होत आहे.
सर्व शिक्षा अभियान, इंग्रजी संभाषण, सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन, बालस्नेही अभ्यासपद्धती आदी विषयांच्या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माऱ्यामुळे खेडय़ापाडय़ांसह शहरांमधील शिक्षकांवरच शाळाबाह्य होण्याची वेळ आली आहे. हे कमी म्हणून की काय, आता त्यात प्रशिक्षणांचे ‘टायमिंग’ चुकल्याने ऐन परीक्षेच्या तोंडावर अभ्यासक्रम पूर्ण करायचा की शाळाबाह्य व्हायचे, या कात्रीत शिक्षक सापडले आहेत. या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा मात्र खेळखंडोबा होत आहे.
कायद्यानुसार पहिली ते पाचवीच्या अध्ययनासाठी वर्षांचे किमान २०० दिवस (८०० तासिका) शिक्षकांनी वर्गात हजेरी लावायला हवी, तर सहावी ते आठवीसाठी किमान २२० दिवस (१००० तासिका). पण प्रशिक्षणांमुळे हे किमान तास भरणे शिक्षकांना शक्य होत नाही. त्यामुळे गेल्या वर्षी शालेय शिक्षण विभागाने जशी विद्यार्थ्यांची पटपडताळणी घेतली तशी शिक्षकांचीही घेतली तर राज्यातील किमान ५० ते ६० टक्के शिक्षक या ना त्या प्रशिक्षणामुळे वर्गावर गैरहजर असलेले आढळून येईल. अभ्यासक्रम परीक्षेच्या आधी कसाबसा पूर्ण व्हावा या प्रयत्नांत बहुतेक शिक्षक असून, त्याचे दुष्परिणाम अर्थातच विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत.
बहुतेक प्रशिक्षण कार्यक्रम दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यापासून सुरू झाले असून ते अजूनही सुरूच आहेत. प्रशिक्षणाच्या माऱ्यातून मुख्याध्यापकही सुटलेले नाहीत. प्रशिक्षणाची गरज शिक्षकांनाही मान्य आहे; परंतु ही सर्व प्रशिक्षणे जून महिन्यात व्हायला हवीत, शैक्षणिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असताना प्रशिक्षण देऊन उपयोग काय, असा सवाल जालना जिल्हातील एका शिक्षकाने केला. दर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शनिवारी सर्व शिक्षा अभियानांतर्गत होणारी गटसंमेलने तर शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरली आहेत. संमेलनाचा विषय आपल्या अध्यापनाचा नसला तरी शिक्षकांना या संमेलनाला हजेरी लावावी लागते, असे चेंबूरमधील एका शिक्षकाने सांगितले.
वेळ चुकते आहे हे मान्य प्रशिक्षणांची वेळ चुकते आहे आणि अनेक प्रशिक्षण कार्यक्रम एकाच वेळी शिक्षकांवर लादले जात आहेत, ही बाब ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे’चे (एससीईआरटी) संचालक एन. के. जरग यांनी मान्य केली. ‘एससीईआरटीचे प्रशिक्षण कार्यक्रम डिसेंबपर्यंत आटोपण्याकडे आमचा कल असतो, मात्र आता सुरू असलेली बहुतांश प्रशिक्षण कार्यक्रम सर्व शिक्षा अभियान आणि माध्यमिक शिक्षा अभियानाची किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविले जाणार आहेत. त्यांच्याकडून उशिरा सूचना आल्याने ती परीक्षेच्या तोंडावर ते राबवावे लागत आहेत. यात आमची भूमिका केवळ प्रशिक्षण कार्यक्रम आखून देण्यापुरती मर्यादित आहे,’ असे स्पष्टीकरण त्यांनी केले. शिक्षकांना प्रामुख्याने एससीईआरटी, यशदा, राज्य शिक्षण मंडळ यांच्यामार्फत प्रशिक्षण दिले जाते. जिल्हा व तालुका स्तरावरील एससीआरटीईचा प्रशिक्षण कार्यक्रम राहून गेल्यास तो तिथल्या शिक्षणाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे, असा खुलासा त्यांनी केला.