मुंबई : सशस्त्र दलांतील कर्मचाऱ्यांना सातत्याने तणावग्रस्त परिस्थितीला सामोरे जावे लागते. सीमा परिसरातील बदलत्या घडामोडीमुळे ते अनेकदा तणावाखाली वावरत असतात. याचा परिणाम त्यांच्या कुटुंबियांवरही होत असतो. त्यामुळे त्यांना मानसिक उपचारांची आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन पुणे येथील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाने सैन्य दलातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिक आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र टेलिमानस कक्षाची स्थापना केली आहे. सैन्य दलातील जवान, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना या कक्षाचा लाभ होणार आहे.
पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दोन वर्षांच्या कालावधीसाठी, पथदर्शी प्रकल्प, राष्ट्रीय टेलिमेंटल हेल्थ हेल्पलाइन ‘टेलिमानस’चा विशेष कक्ष चालविण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. पुण्यातील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या या विशेष टेलिमानस कक्षाचे उद्घाटन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा – मुंबई : महापालिका कर्मचारी बनून टेलिफोन केबलची चोरी, ३५० मीटर रस्ता खोदला
सदैव कारवाईसाठी सज्ज, प्रादेशिक संघर्षांतून येणारा तणाव यामुळे सातत्याने त्यांना तणावग्रस्त परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या उत्तम मानसिक आरोग्यासाठी कुटुंब कल्याण मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने पुणे येथील सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयामध्ये टेलिमानसचा कक्ष स्थापन केला आहे. टेलिमानसच्या या स्वतंत्र कक्षामार्फत सशस्त्र दलातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण याकडे लक्ष देण्याबरोबरच त्यांना मानसिक आरोग्यासंदर्भातील उपचारही त्वरित उपलब्ध केले जाणार आहेत. सैन्य दलासाठी समर्पित असलेल्या या टेलिमानस कक्षामुळे जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना २४ तास महत्त्वपूर्ण मानसिक आरोग्य सहाय्य मिळण्यास मदत होणार आहे.
देशातील ३६ राज्यामंध्ये सुविधा उपलब्ध
प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये मानसिक आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी १४४१६ हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ५१ टेलिमानस कक्ष कार्यान्वित आहेत.
हेही वाचा – रोज ‘म.रे.’ त्याला.., कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल १५ मिनिटे उशिराने
दररोज ३५०० हून अधिक दूरध्वनी
देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत कार्यरत असलेल्या टेलिमानस कक्षातून वेगवगळ्या २० भाषांमध्ये नागरिकांना सेवा दिली जाते. टेलिमानस सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत १० लाखांहून अधिक दूरध्वनी आले आहेत. तसेच दररोज ३ हजार ५०० हून अधिक दूरध्वनी होत असतात.