रसिका मुळ्ये
अगदी तोंडावर आलेली राज्यसेवा परीक्षा शासनाने पुढे ढकलल्याने आता ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’समोरील आव्हाने वाढली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्र, जिल्हा केंद्रांवर आयोगाच्या प्रश्नपत्रिका पोहोचल्या असून आता पुढील निर्णय होईपर्यंत यंत्रणेला त्या सुरक्षित ठेवाव्या लागणार आहेत.
चार वेळा पुढे ढकलावी लागलेली राज्यसेवा परीक्षा येत्या रविवारी घेण्याचे आयोगाचे नियोजन शासनाच्या निर्णयामुळे पुन्हा विस्कळीत झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदा आयोगाने परीक्षा केंद्रे वाढवली होती. राज्यातील ७६१ केंद्रांवर परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. या केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहोचल्या आहेत. मात्र, आता परीक्षा रद्द झाल्यामुळे आता पुढील परीक्षेपर्यंत या प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवाव्या लागणार आहेत.
नव्या प्रश्नपत्रिका काढणे कठीण..
पुन्हा काही महिन्यांत परीक्षा घेण्याची वेळ आल्यास नव्या प्रश्नपत्रिका काढणे कठीण आहे. विविध विषयांतील तज्ज्ञांकडून प्रश्नपत्रिका काढून घेतल्या जातात. त्याबाबत अनेक मुद्दय़ांचा विचार आयोगाला करावा लागतो. त्यामुळे नव्या प्रश्नपत्रिका काढण्यासाठी वेळ आणि श्रम अधिक लागतील.
नोव्हेंबरमधील परीक्षांचे काय? राज्यसेवा परीक्षा रद्द केल्याची घोषणा शासनाने केली. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये अभियांत्रिकी सेवा आणि दुय्यम सेवा परीक्षाही आहे. या परीक्षांसाठीही लाखो उमेदवार बसतात. या परीक्षांबाबत शासनाने काहीच निर्णय जाहीर केलेला नाही.