अचानक पुण्याला किंवा नाशिकला जायचे आहे आणि बसऐवजी रेल्वेचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना तिकिटासाठीच्या भल्या मोठय़ा रांगेत उभे राहण्यावाचून गत्यंतर नसते. मात्र रेल्वेने या भल्या मोठय़ा रांगेवर तोडगा काढला असून मेल-एक्सप्रेस गाडय़ांची अनारक्षित तिकिटे एटीव्हीएमवरच उपलब्ध करण्यात आली आहेत. अर्थात त्यासाठी तुमच्या एटीव्हीएम कार्डमध्ये तेवढे पैसे मात्र असायला हवेत.
सीव्हीएम कुपन्सना पर्याय म्हणून एटीव्हीएम मशीन्स मध्य रेल्वेवर आणणाऱ्या रेल्वे प्रशासनाने ही मशीन्स अधिक लोकप्रिय करण्यासाठी काही पावले उचलली आहेत. त्यानुसार आता मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, ठाणे, कल्याण, कर्जत आणि कसारा या महत्त्वाच्या स्थानकांवरील एटीव्हीएममधून बाहेरगावी जाणाऱ्या गाडय़ांची अनारक्षित तिकिटे काढता येणार आहेत. विशेष म्हणजे १५० किलोमीटरच्या आत असलेल्या प्रवासासाठी एटीव्हीएमवर काढल्या जाणाऱ्या प्रत्येक तिकिटावर ५ टक्के सूट मिळणार आहे. मात्र त्यापुढील अंतरासाठी तिकिटाएवढेच शुल्क मोजावे लागेल.
तिकीट आरक्षण केंद्रावरच्या रांगांप्रमाणेच अनारक्षित तिकिटांसाठीही भल्या मोठय़ा रांगा लागतात. या रांगेत सर्वच गाडय़ांचे प्रवासी असल्याने अनेकदा तिकीट उशिराने मिळाल्यावर गाडय़ा चुकण्याच्या घटनाही घडतात. अशा प्रवाशांसाठी एटीव्हीएम स्मार्ट कार्ड हा उत्तम पर्याय ठरणार आहे. भुसावळ, नाशिक, पुणे, दिल्ली अशा कोणत्याही स्थानकापर्यंत हे अनारक्षित तिकीट मिळणार आहे. ही सुविधा मध्य रेल्वेच्या सहा स्थानकांवरील एटीव्हीएमवर सुरू झाली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी दिली.
मेल-एक्सप्रेसची तिकिटे आता एटीव्हीएमवर काढा
अचानक पुण्याला किंवा नाशिकला जायचे आहे आणि बसऐवजी रेल्वेचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशांना तिकिटासाठीच्या भल्या मोठय़ा रांगेत उभे राहण्यावाचून गत्यंतर नसते.
First published on: 05-12-2013 at 02:26 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now use your atm card to get mail express railway tickets