नियुक्त केलेल्या ठिकाणी हजर असल्याची अॅपद्वारे पडताळणी
पोलिसांची हजेरी लावण्यासाठी तसेच कार्यक्षमता वाढविण्यासाठी मुंबई पोलीस अॅपची मदत घेत असून त्यामुळे वाहतूक पोलीस त्यांची नियुक्ती असलेल्या हद्दीत दिलेल्या वेळेत येत आहेत की नाही आणि ते किती वेळ हद्दीत राहून कधी बाहेर पडतात, याची इत्थंभूत माहिती मुख्यालयात जमा होणार आहे. वाहतूक पोलिसांसाठी कार्यरत असलेल्या ‘एमटीपी’ (मुंबई ट्रॅफिक पोलीस) अॅपमध्ये ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर अशा प्रकारे हजेरी लावण्यात येत असून या प्रयोग यशस्वी झाल्यास ती पूर्ण पोलीस दलासाठी वापरण्याचा विचार आहे.
शहरातील वाहतुकीचे नियमन करण्याचे काम वाहतूक पोलीस करतात. तसेच, प्रसंगी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईही करतात. वाहतूक पोलिसांना त्यांची नियुक्ती असलेल्या हद्दीत पोहोचण्यासाठी त्यांच्या पाळीनुसार वेळ निश्चित केलेली असते. आतापर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या हद्दीत दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या वायरलेसच्या माध्यमातून हजेरी देत होते. तर इतर कर्मचाऱ्यांना पोलीस ठाणे अथवा चौकीत जाऊन हजेरी द्यावी लागत होती. मात्र वाहतूक पोलिसांसाठी विकसित करण्यात आलेल्या एमटीपी (मुंबई वाहतूक पोलीस) अॅपमध्ये हजेरीसाठी एक वेगळी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अॅपमध्ये असलेल्या पर्यायांच्या आधारे पोलीस कर्मचारी-अधिकारी त्यांच्या हद्दीत दिलेल्या चौकी अथवा ठिकाणी दाखल झाल्यानंतर आपली हजेरी लावतो आणि ती हजेरी लावल्यावर तो नक्की हद्दीत आहे की नाही, याची चाचपणी होऊन अवघ्या काही क्षणांत हजेरी लागते. अशा प्रकारच्या पारदर्शक पद्धतीमुळे आपले काम नेटाने करणाऱ्या पोलिसांविषयीची माहिती तर वरिष्ठांना मिळत आहेच, पण त्याचबरोबर कामचुकार पोलिसांवरही वचक राहणार आहे. सध्या वाहतूक पोलीस दलातील १३०० ते १५०० कर्मचारी-अधिकाऱ्यांची हजेरी अशा प्रकारे लावण्यात येत असून हळूहळू त्यांची संख्या वाढवत नेण्यात येणार आहे.
अशी लागते हजेरी
पोलिसांच्या भ्रमणध्वनीवरील अॅपमध्ये ‘इन’ आणि ‘एक्झिट’ असे पर्याय असतात. पोलिसाने त्याच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर ‘इन’वर क्लिक केल्यावर वेळ आणि जागेची नोंद जीपीएसच्या साहाय्याने थेट मुख्यालयात होते. तसेच, कामावरून परत जाताना ‘एक्झिट’वर क्लिक केल्यावर हद्दीबाहेर गेल्याची नोंद होते.
हजेरीच्या या सुविधेमुळे चौकीला जाऊन हजेरी लावण्यात होणारा वेळेचा अपव्यय टाळता येत आहे. सध्या एकूण दलातील एकतृतीयांश पोलीस ही सुविधा वापरत असून हळूहळू ही संख्या वाढत जाईल. पोलिसांनी केवळ हजेरीसाठी त्यांचा बहुमोल वेळ वाया घालविण्याऐवजी थेट त्यांना सांगण्यात आलेल्या ठिकाणी जावे असा यामागचा उद्देश आहे. एका परिसरात ठरावीक वेळी किती पोलीस आहेत याची पूर्ण माहिती असल्याने वाहतूक कोंडी, आपत्कालीन परिस्थितीतही त्याची मदत होऊ शकणार आहे.
– मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त (वाहतूक)