लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : देशातील आघाडीचा बाजारमंच असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात एनएसईने खास महानगर पालिका रोखे अर्थात म्युनिसिपल बाँडसाठी संकेतस्थळ सुरू करण्याची घोषणा शुक्रवारी केली. भांडवली बाजारात या रोख्यांची विश्वासार्हता आणि दृश्यमानता वाढवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नव्याने सादर करण्यात येणारे संकेतस्थळ बाजारातील सहभागींसाठी एक केंद्र म्हणून काम करेल, जी महापालिका रोख्यांसंबंधित व्यापक आकडेवारी प्रदान करेल. ज्यामध्ये रोखे विक्रीचा कालावधी, मानांकन (क्रेडिट रेटिंग), उलाढालीचे प्रमाण (ट्रेडिंग व्हॉल्यूम), अंतर्गत उत्पन्न आणि किंमती तसेच भारताच्या पहिल्यावहिल्या पालिका रोखे निर्देशांक अर्थात ‘निफ्टी इंडिया म्युनिसिपल बाँड इंडेक्स’च्या ऐतिहासिक कामगिरीचा ते वेध घेईल.

महापालिका रोखे बाजारामध्ये पारदर्शकता, सुलभता आणि गुंतवणूकदार जागरूकता वाढवणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. संरचित आणि अद्ययावत माहिती प्रदान करून, हा उपक्रम एक व्यवहार्य गुंतवणूक मार्ग पुढे आणेल. तसेच महापालिका रोख्यांवरील वरील विश्वास मजबूत करण्यासाठी मदतकारक ठरेल, असे एनएसईने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हा उपक्रम संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या सहभागास प्रोत्साहन देईल, ज्यामुळे शेवटी शहरी पायाभूत सुविधांच्या विकासाला मदत होईल, असे एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान म्हणाले.

महापालिका रोखे कशासाठी?

विविध राज्यातील महापालिकांना वेगवेगळ्या पायाभूत प्रकल्पांसाठी लागणारा निधी रोख्यांच्या माध्यमातून उभारण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना दैनंदिन जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आणि महामार्ग, रस्ते आणि शाळांसारख्या भांडवली प्रकल्पांसाठी आवश्यक निधीचा स्रोत यातून खुला झाला आहे. वाढत्या शहरीकरणाकडे पाहता शहरांना पुढील काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाछी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. रोख्यांच्या माध्यमातून कमी व्याजदरात कर्ज मिळवणे महापालिका शक्य होईल.

Story img Loader