मुंबई, दिल्ली आणि राजस्थानमधील १५ मालमत्तांचा समावेश
मुंबई: नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमधील (एनएसईएल) ५६०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ११५ कोटी ८६ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. या मालमत्तांमध्ये मुंबई, दिल्ली आणि राजस्थान येथील १५ स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. त्या मालमत्ता एनएसईएलच्या विविध थकबाकीदार कंपन्यांशी संबंधीत आहेत. याप्रकरणी ईडीने आतापर्यंत ३४३३ कोटींच्या मालमत्तांवर टाच आणली आहे.
नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने ३१ मार्च रोजी १५ मालमत्तांवर टाच आणली. त्या मालमत्ता मुंबई, दिल्ली आणि राजस्थान येथील आहेत. या मालमत्ता मे. मोहन इंडिया ग्रुप, मे. विमलादेवी ॲग्रोटेक लिमि., मे. यथुरी असोसिएट्स आणि मे. लोटस रिफायनरिज या एनएसईएलच्या विविध थकबाकीदारांशी संबंधित असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली.
५६०० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
याप्रकरणी भारतीय दंड संहिता, १८६० अंतर्गत नोंदवलेल्या विविध गुन्ह्यांच्या आधारावर ईडीने याप्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत आरोपींनी गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचे उघड झाले. बनावट गोदाम पावत्या तयार करून, खोट्या नोंदी दाखवून आणि गुंतवणूकदारांना फसवून एकूण ५६०० कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला आहे.
प्रत्यक्षात मालमत्ता नसतानाही एनएसईएल प्लॅटफॉर्मवर वस्तूंचे व्यवहार करण्यात आले. त्याची कोणतीही माहिती गुंतवणूकदारांना नव्हती. त्यामुळे अस्तित्त्वात नसलेल्या वस्तूंमध्ये व्यापार करत होते. त्यानंतर गुंतवणूकदारांच्या सर्व रकमेतून मालमतांची खरेदी करण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्याशिवाय गुंतवणूकदारांची रक्कम कर्जफेड व इतर कामांसाठी वळवण्यात आली, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली.
आतापर्यंत ३४३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
ईडीने याप्रकरणी पीएमएलए कायदा २००२ अंतर्गत कारवाई करून आतापर्यंत एकूण ३४३३ कोटी सहा लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. याप्रकरणात एनएसईएल, विविध थकबाकीदार आणि ब्रोकिंग संस्थांविरुद्ध सात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. या तब्बल पाच हजार ६०० कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी सप्टेंबर २०१३ मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांच्या आधारे ईडीनेही आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी सुरू केली. आरोपींनी गुंतवणुकदारांची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचून त्यांना व्यापार करण्यास प्रवृत्त केले. बनावट गोदाम, पावत्या आणि अन्य बनावट कागदपत्रे, बनावट खाती तयार करून ही फसवणूक केली होती, असा आरोप आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी सध्या ईडी अधिक तपास करत आहे.