राष्ट्रीय सुरक्षा दलासाठी (एनएसजी) मुंबई उपनगरात तयार करण्यात आलेल्या तळाच्या इमारतींच्या बांधकामाबाबतचा प्रश्न निकाली निघाला असून ही इमारत राहण्यासाठी सुरक्षित असल्याचा निर्वाळा ‘आयआयटी रुरकी’च्या तज्ज्ञांनी दिल्यानंतर अखेर राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या कमांडोंनी आपला मुक्काम इमारतीत हलवला आहे.
मुंबईवरील २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर दहशतवादी हल्ला झाल्यास प्रतिबंधक कारवाई जलदरित्या सुरू करता यावी यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाचे एक केंद्र मुंबई उपनगरात उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने अंधेरीत मरोळ येथे २३ एकरची जागा त्यासाठी दिली. तेथे ५६ कोटी रुपये खर्च करून केंद्र उभारण्यात आले आणि तब्बल २४१ ब्लॅक कॅट कमांडोंच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली. ‘राष्ट्रीय इमारत बांधकाम महामंडळा’ने या केंद्राची व निवासी संकुलाच्या बांधकामाची जबाबदारी पार पाडली होती.
मात्र, याचवर्षी फेब्रुवारीमध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर या केंद्राच्या इमारतींना आणि निवासी संकुलांना तडे गेल्याचे दिसून आले. त्यामुळे बांधकामाचा दर्जा आणि इमारतींची सुरक्षितता याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. परिणामी इमारतींच्या बांधकामाच्या सुरक्षिततेची तपासणी करण्यासाठी ‘आयआयटी रुरकी’मधील तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. तज्ज्ञांच्या पथकाने पाहणी व तपासणी करून इमारत राहण्यासाठी सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे आता राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या कमांडोंनी आपला मुक्काम या इमारतींमध्ये हलवला आहे.

Story img Loader