जुलै महिन्यातील सुरुवातीच्या पंधरा दिवसांत दमदार कामगिरी केलेल्या पावसाने आता मुंबई शहर आणि उपनगरांत दडी मारली आहे. मुंबईतील तुरळक ठिकाणी एखादी सर हजेरी लावत आहे. विदर्भात पावसाचा जोर कायम असून राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी होताना दिसून येत आहे. राज्यात मंगळवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून बुधवारपासून मात्र पावसाचे प्रमाण कमी होत जाणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांत मागील आठवड्यात पावसाची तीव्रता कमी होण्यास सुरुवात झाली. गेल्या शनिवारी तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मात्र रविवारी पावसाने विश्रांती घेतली होती. तापमानात वाढ झाल्याने मुंबईकरांना आता पुन्हा एकदा कडक उन्हाला तोंड द्यावे लागत आहे. मुंबई सोमवरीही कोरडीच असल्याचे दिसून आले. मुंबईत तुरळक ठिकाणी खूप हलका पाऊस पडला. तर, उर्वरित भागांत मुंबईकरांना उकाड्याला सामोरे जावे लागले.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये १९ जुलै रोजी मुसळधार पावसाची स्थिती राहणार आहे. त्यानंतर २० जुलैपासून विदर्भातील बहुतांश जिल्हे, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता पावसाची तीव्रता कमी होणार आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये २० जुलैपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयंत सरकार यांनी सांगितले.

Story img Loader