मुंबई : गेल्या काही वर्षात २३ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये यकृताच्या संबंधी विकारांच्या तक्रारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. मद्यपानामुळे होणारे यकृताचे आजार, फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस आणि सिऱ्होसिस यासारख्या विविध परिस्थितींमुळे यकृताचे नुकसान होत आहे. यामुळे तरुणांमधील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. गंभीर बाब म्हणजे हेपेटायटीसच्या उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांपैकी ६० टक्के रूग्णांनी हेपेटायटीस लस घेतलेली नसते. हेपेटायटिसचं वेळीच निदान आणि उपचार झाल्यास रूग्ण बरा होऊ शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यकृत हा मानवाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे जो शरीरातील विविध कार्यांसाठी जबाबदार असतो. यामध्ये डिटॉक्सिफिकेशन, हार्मोन्सचे नियमन, खराब झालेल्या ऊतींची दुरुस्ती, रोगप्रतिकारक प्रणालीची कार्ये आणि आवश्यक पोषक आणि रसायने साठवणे यासारख्या कार्यांचा समावेश होतो. सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे यकृतासंबंधित समस्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तुमच्या यकृताला हानी पोहोचवणारे विविध घटक म्हणजे मद्यपान, सिगारेट ओढणे, पुरेसे पाणी न पिणे, आहारातील सोडियमचे अधिक प्रमाण, विषाणूजन्य संसर्ग आणि काही औषधे दीर्घकाळापर्यंत घेणे. टाईप २ मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्टेरॉल यासारख्या आरोग्य समस्या देखील यकृताशी संबंधित समस्या विकसित होण्याची शक्यता वाढते.

हे ही वाचा… मुंबईकरांना स्वाईन फ्लूचा विळखा, रोज २० ते २५ रुग्णांची नोंद

प्रामुख्याने डॉक्टर, परिचारिका तसेच रक्ताशी संबंधित आरोग्य सेवकांनी हेपटायटीसची लस घेणे आवश्यक असल्याचे केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. रक्ताच्या संपर्कात म्हणजे शस्त्रक्रिया करणारे व त्याच्याशी संबंधित लोकांनी याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. मी स्वतः नियमितपणे हेपटायटीसची लस घेतो असेही डॉ सुपे म्हणाले. अलीकडे तरुण मुले अंगावर टॅटू काढतात. यासाठी वापरण्यात येणार्या सुया कितपत निर्जंतुक असतात याची कल्पना नाही, तथापि तरुणांमध्ये वाढणार् या हेपटायटीसमागे हेही एक कारण आहे. अंमली पदार्थांचे सेवन हे दुसरे कारण आहे. तसेच जोडीदाराला हेपटायटीस असल्यास लैंगिक संबंध ठेवताना काळजी घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. हेपटायटीस पाच प्रकारचे असतात. यात ए, बी, सी, डी व ई हे प्रकार असून ‘ए’ व ‘ई’ प्रामुख्याने पाण्यातून होतात. ‘ए’ लहान मुलांमध्ये आढळून येतो. हेपटायटीस ‘सी’ साठी गेल्या दहा वर्षात प्रभावी औषधे उपलब्ध झाल्यामुळे या प्रकारातील आजार बरा होऊ शकतो. प्रामुख्याने आरोग्य क्षेत्रातील ज्यांचा संबंध शस्त्रक्रिया वा रक्ताशी येतो त्यांनी प्राधान्याने लस घेतली पाहिजे, असे डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले.

परेल स्थित ग्लेनईग्लस रूग्णालयातील हेपॅटोलॉजिस्ट व यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ उदय सांगलोडकर म्हणाले की, २३ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये यकृतासंबंधित गंभीर परिस्थिती जसे की तीव्र व्हायरल हेपेटायटीस, सिऱ्होसिस, अल्कोहोलिक हेपेटायटीस, फॅटी लिव्हर आणि एनएएसएच (नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर) यकृताचे आजार मोठ्या संख्येने वाढत आहेत. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ही संख्या जवळजवळ दुप्पटीने जास्त आहे. ही संख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून चूकीची जीवनशैली आणि अल्कोहोलचे वाढते सेवन हे यास कारणीभूत ठरत आहे . अशा तरुणांमधीस आरोग्यासंबंधी तक्रारी म्हणजे कावीळ (त्वचा आणि डोळे पिवळे पडणे), वजन कमी होणे, मळमळ आणि उलट्या होणे, अशक्तपणा, पायांवर सूज येणे, प्लीहा वाढणे आणि पोटात द्रव जमा होणे.गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत ही संख्या वाढली आहे.उपचाराकरिता येणाऱ्या ५ पैकी १ रुग्ण (२५ ते ३० वयोगटातील) यकृताच्या आजाराने ग्रस्त असून गेल्या पाच वर्षांच्या तुलनेने हा दर वाढला आहे.

हे ही वाचा… केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी; केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांचे प्रतिपादन

डॉ सांगलोडकर पुढे म्हणाले की, हिपॅटायटीस हा यकृताचा (Liver) आजार आहे जो ५ प्रकारच्या हिपॅटायटीस विषाणूंमुळे होतो. हिपॅटायटीस ए, बी,सी,डी आणि ई विषाणुंचा समावेश आहे. हिपॅटायटीस ए (दूषित पाणी किंवा अन्नाद्वारे पसरतो), हिपॅटायटीस बी(संक्रमित व्यक्तीच्या रक्ताच्या संपर्कातून किंवा असुरक्षित लैंगिक संपर्काद्वारे पसरतो) हिपॅटायटीस सी (रक्त संक्रमणातून पसरतो, हिपॅटायटीस डी(फक्त हिपॅटायटीस बी चे निदान झालेल्या लोकांना होतो), हिपॅटायटीस ई(दूषित पाण्याद्वारे पसरतो.हिपॅटायटीसचा संसर्ग झालेल्यांना हिपॅटायटीसची लस मिळालेली नाही असे दिसून येते.हिपॅटायटीस संसर्गाच्या उपचारासाठी आलेल्या ६० टक्के रुग्णांनी हिपॅटायटीसची लस घेतलेलीच नाही, असे निदर्शनास आले आहे. हिपॅटायटीस हा संसर्ग लसीकरणाने सहज टाळता येऊ शकतो. सध्या, आमच्याकडे हिपॅटायटीस ‘ए’ आणि ‘बी’ विरूद्ध लस उपलब्ध आहेत ज्या १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व उच्च-जोखीम असलेल्या व्यक्तींनी घेणे गरजेचे आहे. औषधोपचार करणे, पौष्टिक आहाराचे सेवन, प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे, व्यायाम करणे, दारूचे व्यसन सोडून यकृत निरोगी ठेवता येऊ शकते. लिव्हर सिऱ्होसिसमुळे यकृताचे नुकसान होऊ शकते आणि यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता भासू शकते.

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश कुराने म्हणाल की, जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन हे २० ते ३६ वयोगटातील तरुणांमध्ये यकृताचे आजार वाढण्याचे मुख्य कारण ठरत आहे, ज्यामुळे फॅटी लिव्हर रोग आणि अल्कोहोलिक हेपॅटायटीस सारख्या परिस्थितींना आमंत्रण मिळत आहे. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि आहारातील साखरेच्या लहान वयात यकृताचे नुकसान होऊ शकते.ताप, अस्वस्थता, थकवा, भूक न लागणे, उलट्या होणे, अतिसार आणि पोटदुखी ही हिपॅटायटीसची सामान्य लक्षणे आहेत. यकृताच्या आजारावरील उपचारांमध्ये आरोग्यदायी आहाराचा अवलंब करणे, दारू सोडणे आणि नियमित शारीरिक हालचाली यांचा समावेश होतो. कावीळ आणि ओटीपोटात दुखणे यासारखी लक्षणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि यकृताच्या समस्या टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावे. यकृत रोगाच्या जोखमींबद्दल तरुणांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांमधील गुंतागुंत टाळण्यासाठी वेळीच उपचार गरजेचे आहे. हा जीवघेणा संसर्ग टाळण्यासाठी हिपॅटायटीस ‘ए’ आणि ‘बी’ लसीकरण महत्त्वाचे आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Number of cases increasing in liver diseases among youth most of patients have not received hepatitis vaccine mumbai print news asj