मुंबई : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दोन रेल्वेगाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला असून दोन्ही रेल्वेगाड्यांचे प्रत्येकी दोन डबे वाढले आहेत. हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेस आणि हजरत निजामुद्दीन – मडगाव – हजरत निजामुद्दीन द्वि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला प्रथम श्रेणीचा वातानुकूलित डबा आणि तृतीय श्रेणीचा वातानुकूलित डबा असे दोन डबे कायमस्वरूपी जोडण्यात येणार आहेत.

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १२४३२ हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम सेंट्रल त्रि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला ४ फेब्रुवारीपासून तर, गाडी क्रमांक १२४३१ तिरुवनंतपुरम सेंट्रल- हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला ६ फेब्रुवारीपासून डबे जोडण्यात येतील. गाडी क्रमांक २२४१४ हजरत निजामुद्दीन मडगाव द्वि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला ७ फेब्रुवारीपासून तर, गाडी क्रमांक २२४१३ मडगाव- हजरत निजामुद्दीन द्वि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला ९ फेब्रुवारीपासून अतिरिक्त डबे जोडले जातील. या वाढीव डब्यांमुळे या रेल्वेगाडीचे एकूण डबे २० वरून २२ होतील. दोन्ही गाड्यांच्या डब्यांची सुधारित रचना प्रथम श्रेणी वातानुकूलित २ डबे, द्वितीय श्रेणी वातानुकूलित ५ डबे, तृतीय वातानुकूलित १२ डबे, पन्ट्री कार १ आणि जनरेटर कार २ अशी असणार आहे.

सावंतवाडीतील थांबा प्रतिक्षेत

गाडी क्रमांक १२४३२/१२४३१ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन त्रि-साप्ताहिक राजधानी एक्स्प्रेसला सावंतवाडी स्थानकावर पूर्वी थांबा होता. मात्र वक्तशीरपणा वाढवण्यासाठी करोना काळात हा थांबा रद्द केला. परंतु, अद्याप तो पुन्हा सुरू करण्यात आलेला नाही.

विदर्भ-कोकणाला जोडणारी विशेष रेल्वेगाडी

‘धारातीर्थ गडकोट मोहीम २०२५’ निमित्त नवीन अमरावती ते वीर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार येणार आहे. त्यामुळे विदर्भ आणि कोकणाला जोडणारी रेल्वेगाडी धावेल. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११०१ विशेष रेल्वेगाडी नवीन अमरावती येथून ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि वीर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०११०२ विशेष रेल्वेगाडी वीर येथून ११ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता सुटेल आणि नवीन अमरावती येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता पोहोचेल. या रेल्वेगाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा येथे थांबा असेल. या रेल्वेगाडीला १६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय सीटिंगसह गार्ड ब्रेक व्हॅन अशी संरचना असेल. या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अशी मध्य रेल्वे प्रशासनाकडून केले आहे.

Story img Loader