मुंबई : सायबर हल्ल्याचे प्रमाण जगात वाढत असून सर्वाधिक सायबर हल्ले होणाऱ्या देशात भारताचा समावेश आहे. सायबर संरक्षण हे भारतीय संरक्षण क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे, त्यामुळे याविरोधात लढा देण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) संशोधन सुरू केले आहे. सायबर हल्ल्यापासून संरक्षण मिळेल असा विश्वास डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर कामत यांनी व्यक्त केला.
आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टच्या पहिल्या दिवशी झालेल्या सत्रात डॉ. कामत यांचे सायबर हल्ले आणि डीआरडीओची कामगिरी या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. सायबर हल्ल्यांच्या माध्यमातून अनेकजण देशाचे संरक्षक कवच भेदण्याचा प्रयत्न करत असतात. कधी हे दहशतवाद्यांकडून होत असते, तर कधी शत्रू राष्ट्रांकडून होते. या हल्ल्यातून बऱ्याचदा देशाची सुरक्षा धोक्यात येत असते. भारतात जानेवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत ७.४० लाख सायबर गुन्हे तर ३७ लाख सायबर हल्ल्यांची नोंद झाली आहे. या हल्ल्यांत खासगी कंपन्या, बँका यांच्यासह सरकारी कार्यालये आणि काही लष्करी आस्थापनांवरील हल्ल्यांचाही समावेश आहे. त्यामुळे सायबर हल्ले कसे रोखता येतील, या दृष्टीने आता डीआरडीओने संशोधन सुरू केले आहे, असे डॉ. कामत यांनी सांगितले.
लष्करी संशोधनासाठी पाच नव्या संस्था स्थापन
भारतीय लष्कर हे अत्याधुनिक आणि अद्ययावत शस्त्रास्त्रांनी सज्ज असावे यासाठी अधिकाधिक संशोधनावर भर देण्यात येत आहे. संशोधनासाठी तरुणांनी पुढे यावे यासाठी डीआरडीओने पाच नवीन संस्था सुरू केल्या आहेत. यात आर्टिफिशियन इंटेलिजन्स, असिमेट्रिक टेक्नॉलॉजी, स्मार्ट मटेरियल्स, क्वांटम टेक्नॉलॉजी आणि कॉग्निटिव्ह सेन्सर टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे. या संस्थांची जबाबदारी ही ३५ वर्षांखालील तरुण शास्त्रज्ञांवर सोपविण्यात आली असल्याचे डॉ. कामत यांनी सांगितले.
हेही वाचा…उकाड्याने मुंबईकर हैराण
एमएसएमई आणि नवउद्यमींसाठी ५० कोटींचा निधी
संरक्षण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नवउद्यमी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय डीआरडीओने घेतला आहे. त्यानुसार यासाठी पुढे येणाऱ्या प्रत्येक नवउद्यमी आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग या प्रत्येक संस्थेसाठी ५० कोटीचा निधी देण्यात येणार आहे, असेही डॉ. समीर यांनी सांगितले.
नवी मुंबई विमानतळ अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार – जीत अदानी देशात २०१६ मध्ये मुंबई आणि नवी दिल्लीमधील विमानतळाचे खासगीकरण करण्यात आले. दिल्ली विमानतळ हे मुंबईपेक्षा मोठे असले तरी मुंबई विमानतळांवर उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यापार्श्वभूमीवर नवी मुंबई येथे बांधण्यात येत असलेल्या विमानतळाची गरज ही प्रकर्षाने अधोरेखित होत आहे. खरे तर हा विमानतळ १० वर्षांपूर्वी बांधला जाणे गरजेचे होते. मात्र आता नवी मुंबई येथे बांधण्यात येत असलेला विमानतळ हा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अधिक सुसज्ज असेल. विमानतळावर प्रवेश करण्यापासून ते तेथील प्रसाधनगृहांपर्यंत विविध ठिकाणी स्वयंचलित यंत्रणा असेल, असे अदानी एअरपोर्ट होल्डिंग लि. कंपनीचे संचालक जीत अदानी यांनी दिली.
हेही वाचा…चेंबूरमध्ये सोनेरी कोल्ह्याचा तरुणावर हल्ला
आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमधील व्याख्यानादरम्यान त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध संशोधने आणि त्याचा प्रत्यक्ष कामात होणारा वापर यांवर त्यांनी भाष्य केले. प्रत्येक व्यक्तीची गूणसूत्रे भिन्न असतात. त्यामुळे प्रजातीय (जेनेरिक) औषधे हा आरोग्याच्या दृष्टीने खात्रीलायक उपाय नाही. या विषयावर संशोधन करून प्रत्येक व्यक्तीच्या गूणसूत्रांचा अभ्यास करून त्यानुसार औषधाची रचना झाली, तर प्रजातीय औषधे लोप पावतील, असेही जीत अदानी यांनी सांगितले.