मुंबई : राज्यात यंदा गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या जेमतेम १८६ वर गेली आहे. मागील हंगामात २०७ कारखान्यांनी गाळप केले आहेत. हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरीही गाळपाला गती आलेली नाही.
साखर आयुक्तालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदा राज्यातील २०७ कारखान्यांनी गाळप परवान्यांसाठी अर्ज केले होते. पहिल्या टप्प्यात १७९ कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले होते. त्यानंतर आणखी सात कारखान्यांनी परवाने दिले आहेत. पाच कारखान्यांचे प्रस्ताव प्रादेशिक स्तरावर अडकले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरअखेर जेमतेम १७५ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. उर्वरित कारखान्यांत गाळप आठवडाभरात सुरू होईल.
हेही वाचा…ठाणे जिल्हा रुग्णालयात रविवारी एकाच दिवशी झाल्या ७२ लहान मुलांवर शस्त्रक्रिया!
मागील वर्षी २०७ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. यंदाही २०७ कारखान्यांनी गाळपासाठी अर्ज केला होता. पण, अनेक कारखान्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि साखर संकुल मदत निधी दिलेला नाही. शिवाय अन्य सरकारी थकबाकीही भरलेली नसल्यामुळे अनेक कारखान्यांना परवाने थांबविले होते. कारखान्यांकडून अटींची पुर्तता झाल्यानंतर परवाने देण्यात आले आहेत. पण, पंधरा दिवसांनंतरही गाळप हंगामाने गती घेतलेली नाही.
साखर उतारा १०.५० टक्क्यांवर
विधानसभा निवडणुकीचा परिणाम काही कारखान्यांच्या गळीत हंगामावर झाला आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यामुळे गाळप हंगामाच्या तयारीकडे दुर्लक्ष झाले आहे. पण, यंदा मजुरांची संख्या चांगली आहे. मागील वर्षी मजुरीत वाढ दिल्यामुळे राज्याबाहेर जाणारे मजूर राज्यात थांबले आहेत. त्यामुळे कारखान्यांवर पुरेसे मजूर आहेत. त्यासोबत ऊसतोडणी यंत्रांद्वारे होणाऱ्या तोडणीत चांगली वाढ झाली आहे. हंगाम उशिराने सुरू झाल्यामुळे आणि चांगली थंडी पडल्यामुळे साखर उताऱ्यात चांगली वाढ दिसून आली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच १०.५० टक्क्यांवर साखर उतारा गेला आहे, अशी माहिती कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी दिली.
हेही वाचा…दीड कोटी बालकांना आरोग्य विभाग देणार जंतनाशक गोळी!राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमीत्त…
परवाने देण्याचे काम सुरू
गाळप परवानगीसाठी साखर आयुक्तलयाकडे अर्ज केलेल्या बहुतेक कारखान्यांना परवाने दिले आहेत. ज्या कारखान्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्या पूर्ण करून कारखान्यांना परवाने दिले जात आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून गाळप हंगाम गती घेईल, अशी माहिती साखर सहसंचालक महेश झेंडे यांनी दिली.