मुंबई : कडक उन्हामुळे मुंबईतील झाडे वेगाने सुकत चालली असून झाडे मृत होण्याचे प्रमाण वाढण्याची भीती मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाळ्याला अद्याप वेळ असला तरी पालिकेच्या उद्यान विभागाने आतापासूनच झाडांचे सर्वेक्षण करण्याचे ठरवले आहे. तसेच मुंबईत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून या कामांमुळेही झाडांच्या मुळांना धक्का लागत आहे. त्याचीही दखल या सर्वेक्षणात घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाचा उन्हाळा कडक असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. फेब्रुवारी महिना देखील अतिउष्ण म्हणून नोंदवला गेला आहे. या सगळ्याचा परिणाम झाडांवरही होऊ लागला आहे. मुंबईत रस्त्याच्यालगत असलेली झाडे पावसाळ्यात उन्मळून पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. झाड किंवा झाडाची फांदी अंगावर पडल्यामुळे मृत्यू होण्याच्या घटनाही घडतात. त्यामुळे पालिकेच्या उद्यान विभागातर्फे दरवर्षी उन्हाळ्यात झाडांचे सर्वेक्षण केले जाते. वाढलेल्या फांद्याची छाटणी केली जाते. तसेच खाजगी आवारातील झाडांच्या फांद्या कापण्यासाठी सोसायट्यांना नोटीसा दिल्या जातात. यंदा मात्र उद्यान विभागाने उन्हाळ्यामुळे झाडांचे नुकसान होत असल्याबाबत भीती व्यक्त केली आहे.

उद्यान विभागाने उपअधीक्षकांना आपापल्या विभागातील झाडांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. दिवसेंदिवस तापमान वाढत असून वातावरणातील उष्मा वाढत आहे. त्यामुळे मातीतील ओलावा नष्ट होत आहे. तसेच झाडाच्या खोडातील, फांदीतील पाणीही सुकत आहे. त्यामुळे सुकलेल्या अवजड फांद्या तुटून पडण्याची शक्यता आहे. तसेच मातीतील पाणी सुकत असल्यामुळे झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवू शकत नाही. त्यामुळे झाडे मुळासकट उन्मळून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपअधीक्षकांनी झाडांचे सर्वेक्षण करावे आणि मृत होत असलेल्या झाडांची माहिती घ्यावी. कमकुवत झालेल्या फांद्या काढून टाकाव्यात, तसेच झाडांचा असमतोल सुधारावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. ही कामे होत नाहीत तोपर्यंत पाठपुरावा करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

कॉंक्रीटीकरणामुळेही झाडे कमकुवत

मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर रस्ते कॉंक्रीटीकरणाची कामे सुूरू असून ही कामे करताना अनेकदा कंत्राटदारांकडून झाडांचे नुकसान होते. उपयोगिता वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खणले जातात. त्यावेळी झाडांच्या मुळांना धक्का लागतो. तसेच झाडांचा समतोल बिघडतो. त्यामुळे अशा झाडांचीही माहिती सर्वेक्षणात घ्यावी, असेही निर्देश उपअधीक्षकांना देण्यात आले आहेत.