लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या रस्ते काँक्रिटीकरण कामांचा वेग वाढण्यासाठी रेडी मिक्स काँक्रिटची पुरवठा साखळी अधिक मजबूत करून त्यासाठी प्रकल्प चालक आणि रस्ते कामांचे कंत्राटदार यांनी आपापसात समन्वयाने त्वरित कार्यवाही करावी. आरएमसी प्रकल्पातून तयार मिश्रण वाहून नेणाऱ्या वाहनांची संख्या वाढवण्यात यावी. तसेच या वाहनांच्या फेऱ्यांची वेळ कमी करावी, जेणेकरून काँक्रिटीकरणाची गती वाढेल. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मंगळवारी यंत्रणांना दिल्या. सध्या सुरू असलेली रस्त्यांची कामे कोणत्याही परिस्थितीत ३१ मेपर्यंत पूर्ण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुंबईकरांच्या सुलभ आणि जलद प्रवासासाठी मुंबई शहर विभागात रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. रस्ते काँक्रिटीकरणा अंतर्गत शीव येथील रस्ता क्रमांक २७ वरील काँक्रिटीकरण कामाची बांगर यांनी मंगळवारी उशिरा रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुलातील मीलन रोड बिल्टेक एलएलपी या रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्रकल्पालाही बांगर यांनी आकस्मिक भेट दिली. महानगरपालिका क्षेत्रात सिमेंट काँक्रिट रस्त्यांची सुरू असलेली कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करावी, असे आदेश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. या कामांची सद्यस्थिती पाहण्यासाठी बांगर हे मुंबई शहरासह दोन्ही उपनगरांमध्ये सुरू असलेल्या रस्ते कामांना प्रत्यक्ष भेट देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एफ उत्तर विभागात शीव (पूर्व) परिसरात मंगळवारी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता.
या दौऱ्याप्रसंगी रस्ते काँक्रिटीकरणाचे संपूर्ण प्रात्यक्षिक बांगर यांनी पाहिले. काँक्रिटीकरण सुरू होण्यापूर्वी केलेली पायाभरणीची कामेही त्यांनी पाहिली. तसेच संबंधित अभियंत्यांकडून कार्यवाहीचा सविस्तर तपशील जाणून घेतला. रस्त्याच्या बांधणीत काँक्रिटचा खालचा स्तर ज्याला ड्राय लीन काँक्रिट म्हटले जाते, त्याचा दर्जा चांगला असेल व पृष्ठभाग समतल असेल तर रस्त्यावर टाकल्या जाणाऱ्या काँक्रिटची गुणवत्ता चांगली राहते, असे आय. आय. टी. चे सहयोगी प्राध्यापक सोलोमन देबबर्मा यांनी सांगितले. या निरीक्षणानुसार एफ उत्तर विभागातील आणि इतर सर्व ठिकाणच्या रस्ते काँक्रिटीकरण कामांमध्ये या तिन्ही बाबींची बारकाईने पाहणी करावी, असे आदेश बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जलवाहिन्यांच्या कामांबाबतही अधिकाऱ्यांना आदेश
एफ उत्तर विभागात रस्ते काँक्रिटीकरण कामांच्या अनुषंगाने जल वाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. त्याची सविस्तर माहिती बांगर यांनी जाणून घेतली. एफ उत्तर विभागात बहुतांश ठिकाणी जलवाहिन्या या पदपथांखाली असल्यामुळे प्रत्यक्ष वाहतूक मार्ग कामात अडथळा येत नाही, अशी माहिती संबंधितांनी दिली. जेवढे रस्ते व पदपथ ३१ मे पूर्वी पूर्ण होतील, तेवढ्याच लांबीच्या जलवाहिन्या टाकाव्यात. त्यासाठी जलअभियंता विभागाशी योग्य तो समन्वय साधावा. कोणत्याही स्थितीत संबंधित रस्ते व पदपथ ३१ मे पूर्वी गुणवत्ता राखून पूर्ण करावे, अशा सूचना बांगर यांनी दिल्या.
रेडी मिक्स काँक्रिट प्रकल्पाला आकस्मिक भेट
एफ उत्तर विभागातील पाहणीनंतर बांगर यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील मीलन रोड बिल्टेक एलएलपी या रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्रकल्पाला आकस्मिक भेट दिली. आरएमसी प्रकल्पांमधून रस्ते काँक्रिटीकरण कामांसाठी तयार मिश्रणाचा पुरवठा होत असल्याने त्याठिकाणी नेमकी काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी या प्रकल्पातील स्वयंचलित यंत्रणा, नियंत्रण कक्षातील संगणकीय प्रणालीची बांगर यांनी पाहणी केली. मिश्रण तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता, मिश्रणामध्ये मिसळली जाणारी खडी व इतर साहित्य यांच्या साठ्यावर पाणी शिंपड्यासाठी स्वयंचलित यंत्रणा, पाण्याचे तापमान कमी करण्यासाठी बर्फाच्या उपयोगातून शीतकरण प्रणाली या सर्व सुविधांची बांगर यांनी पाहणी केली. तसेच ‘रेडी मिक्स काँक्रिट’चे वाहन निघण्यापूर्वी स्लम्प कोन, मिश्रणाचे तापमान आदी चाचण्या करण्यात आल्या.