Mumbai Mhada Lottery: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) लॉटरी जिंकणे हे मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्या अनेकांचे स्वप्न असते. मात्र विरारमधील एका परिचारिकेला हे घर नशिबात असूनही एजंटच्या हव्यासापोटी १४ वर्षे आपल्या स्वप्नापासून दूर राहावे लागल्याचे समजतेय. प्राप्त माहितीनुसार एजंटने म्हाडाचे घेत मिळालेल्या परिचारिकेका १४ वर्षे अंधारात ठेवून मग तिचा फ्लॅट बळकावून पैसे उकळले आहेत. सदर महिलेने आता एजंटविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
जंगापल्लेने कशी केली फसवणुकीला सुरवात?
खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या मीनाक्षी जाधव-सावंत (४२) यांनी फेब्रुवारी २००९ मध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गांतर्गत म्हाडा फ्लॅटसाठी अर्ज केला होता. मे २००९ मध्ये तिला लॉटरी लागली. तिने जात कोट्याअंतर्गत अर्ज केल्यामुळे तिला जात प्रमाणपत्र सादर करावे लागले, असे तिच्या तक्रारीत म्हटले आहे.
प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तिने बोरिवली तहसीलदार कार्यालयात भेट दिली आणि याच दरम्यान, तिला जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या आरोपी सुनील जंगापल्ले (५६) याच्या संपर्कात ती आली. जंगापल्ले यांनी मीनाक्षी यांना विश्वासात घेतले होते. इतकंच नाही तर जंगापल्ले जात प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे सादर करण्यासाठी म्हाडा कार्यालयात सुद्धा पोहोचले होते
मात्र नंतर जंगापल्ले यांनी मीनाक्षी यांना त्यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला असून त्यांची फाईल म्हाडाने रद्द केली आहे असे कळवले. घराचा ताबा मिळवण्यासाठी आवश्यक जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने हा निर्णय घेण्यात आला असेही त्यांना सांगण्यात आले. मीनाक्षी यांनी जंगापल्ले यांना या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यास सांगितले व सर्व कागदपत्रे सुद्धा त्यांच्याकडे दिली.
हे सर्व घडताना मीनाक्षी या अविवाहित होत्या. नंतर २०१४ मध्ये त्यांनी लग्न केले आणि जंगापल्ले यांच्याकडे पाठपुरावा करणे बंद केले. त्याच सुमारास मीनाक्षी यांच्या पालकांनी संबंधित शासकीय विभागाच्या ठाणे कार्यालयात चौकशी केली असता जंगापल्ले यांनी त्यांच्या वतीने जात पडताळणी प्रमाणपत्र जमा केल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात न आल्याने कुटुंबीयांनी जंगापल्ले यांच्याकडून प्रमाणपत्र घेतल व विषय थांबवला.
मीनाक्षी यांना कसा मिळाला पहिला पुरावा?
अलीकडे पुन्हा एकदा मीनाक्षी जाधव यांनी जंगलपल्ले यांना काही कामानिमित्त बोलावले होते, दोघांची दहिसर येथील शैलेंद्र नगर येथे भेट झाली. मात्र भेटीपूर्वी मीनाक्षी यावेळेस म्हाडा इमारतीच्या एका गृहनिर्माण संस्थेच्या सचिव आणि अध्यक्षांना भेटल्या होत्या व त्यावेळी त्यांनी असे सांगितले की त्यांच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर तुमच्या (मीनाक्षी यांच्या) नावावर फ्लॅट आहे. जंगापल्ले यांनी आपण आपला नातेवाईक असल्याचे सोसायटी सदस्यांना सांगितले होते. जंगापल्ले सदर फ्लॅट १३ वर्षांपासून वेगवेगळ्या लोकांना भाड्याने देत होता आणि त्याचे पैसेही घेत होता असेही या अधिकाऱ्यांनी मीनाक्षी यांना सांगितले.
हे सगळं समजताच धक्का बसलेल्या मीनाक्षी यांनी जेव्हा जंगापल्लेला याविषयी विचारले तेव्हा त्याने त्यांनाच चक्क ३५ लाख रुपये दिल्यावर फ्लॅटचा ताबा देऊ असं सांगितलं. यानंतर मीनाक्षी जाधव यांनी फ्लॅट विक्रीचा करार, शपथपत्र आणि जंगापल्ले यांनी सादर केलेली पॉवर ऑफ अॅटर्नीची कागदपत्र मिळवली त्यावेळेस ही सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे सिद्ध झाले. या कागदपत्रांच्या आधारे जंगापल्ले यांनी २०२२ मध्ये किशोर मोरे याला ३५ लाख रुपयांना फ्लॅट विकला होता.
हे ही वाचा<< विवस्त्र केलं, चुंबन घेत Video काढला अन्.. IIT BHU मधील भयंकर घटना! तरुणीने सांगितलं १५ मिनिटांत काय घडलं?
जाधव यांनी मोरे यांच्याकडे जाऊन त्यांना फ्लॅट रिकामा करण्यास सांगितले असता त्यांनी नकार दिल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर जाधव यांनी दहिसर पोलिसात जाऊन जंगापल्ले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. ३० ऑक्टोबर रोजी जंगापल्ले यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत फसवणूक, बनावट कागदपत्रे बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.