नाईटिंगेलच्या सेवाव्रताचा आदर्शही कमी ठरावा अशी ही कहाणी माहिमच्या हिंदुजा रुग्णालयातील रिटा नावाच्या परिचारिकेची आहे. आपला पती गंभीर आजारी असतानाही तिने रुग्णांची सेवा करणे सुरुच ठेवले होते. पती वाचण्याची शक्यता नाही व ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांकडून समजताच आपले दु:ख बाजूला सारत पतीचे यकृत, मूत्रपिंड व डोळे दान करण्याचा निर्णय रिटाने घेतला. तिच्या या निर्णयामुळे पाचजणांना आज नवजीवन मिळाले आहे.
अवयवदान चळवळीवर भाषण करणारे अनेक आहेत. परंतु आपल्या नातेवाईकाचा ब्रेन डेड झाल्यानंतर त्याच्या अवयवांचे दान करण्याची हिम्मत दाखवणारे अपवादाने असतात. केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनाच्या पाश्र्वभूमीवर अवयवदान चळवळ वाढविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने जाहीर केला. प्रामुख्याने ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाच्या अवयवदानाबाबत प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू झाले. अनेक सामाजिक संघटनाही यासाठी प्रयत्नशील असल्या तरी आपल्या रुग्णाच्या अवयवदानाची तयारी बहुतेकजण दाखवत नाहीत. या पाश्र्वभूमीवर हिंदुजा रुग्णालयात गेली अनेक वर्षे सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या ज्येष्ठ परिचारिकेने रुग्णसेवेचा नवा मार्ग दाखवला आहे. पतीचा मृत्यू समोर दिसत असताना त्याचे अवयव अन्य गरजू रुग्णांना देण्याच्या तिच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. हिंदुजा रुग्णालयाचे संचालक डॉ. गुस्ताद डावर व डॉ. अ‍ॅलन अल्मेडा यांनी नाईटिंगेल्सच्या पुढे जाऊन नवा आदर्श निर्माण केल्याचे सांगितले. या अवयवदानामुळे एका रुग्णाला यकृत मिळून जीवनदान मिळाले तर दोन रुग्णांना किडनी मिळाल्या. यातील एक किडनी ज्युपिटर रुग्णालयात तर एक हिंदुजा रुग्णालयातील रुग्णाला मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय दोन अंधांना नवी दृष्टी मिळाली आहे.