मुंबई : केईएम, नायर व शीव रुग्णालयातील सर्व परिचारिका जुन्या कामांच्या वेळांप्रमाणेच रुग्णालयांमध्ये सेवा देतील. मात्र प्रशासनाने नव्या कामाच्या वेळेची जबरदस्ती केल्यास किंवा परिचारिकांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मुंबई महानगरपालिकेच्या तिन्ही रुग्णालयातील परिचारिकांच्या संघटनांनी दिला आहे.
नायर, केईएम, शीव रुग्णालयातील परिचारिकांच्या कामाच्या वेळांमध्ये बदल करण्याचा आणि साप्ताहिक सुट्ट्या कमी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. या निर्णयाविरोधात परिचारिका संवर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटनांची सोमवारी दुपारी म्युनिसिपल मजदूर युनियनच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत प्रशासनाच्या एकतर्फी निर्णयाचा निषेध करण्यात आला. तसेच परिचारिका संवर्गाच्या सध्याच्या कामाच्या वेळा कायम ठेवाव्यात यावर सर्व संघटनांचे एकमत झाले. त्यामुळे सर्व परिचारिका सध्याच्या कामांच्या वेळांप्रमाणेच तिन्ही रुग्णालयांमध्ये सेवा देतील असा निर्णय घेण्यात आला. परंतु नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सध्या कोणतेही तीव्र आंदोलन न करण्याचा निर्णय सर्व संघटनांनी घेतला. परंतु प्रशासनाने अतिरेकी भूमिका घेऊन परिचारिकांवर जबरदस्तीने निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्यास किंवा परिचारिकांवर शिस्तभंगाच्या कारवाई केल्यास सर्व रुग्णालयातील परिचारिका तीव्र आंदोलन करतील, असा इशारा संघटनांकडून देण्यात आला. या बैठकीला दी म्युनिसिपल युनियनचे रमाकांत बने, रंगनाथ सातवसे, म्युनिसिपल नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियनच्या त्रिशीला कांबळे, रंजना आठवले, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या ॲड. रचना अग्रवाल आणि नोबल नर्सिंग युनियनच्या कल्पना गजूला आदी उपस्थित होते.
महानगरपालिका प्रशासनाने योग्य व न्याय विचार करून कामांच्या वेळाबाबत आणि परिचारिका संवर्गाच्या साप्ताहिक सुट्ट्या कमी करण्याचा घेतलेला एकतर्फी निर्णय मागे घेण्यात यावा, असे आवाहन सर्व कामगार संघटनांनी केले आहे.