लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील परिचारिकांच्या कामाच्या वेळेत १६ जूनपासून बदल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेमध्ये बदल करण्यापूर्वी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना अथवा त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेस कोणत्याही प्रकारची नोटीस न देता हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात १७ जूनपासून तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय दी म्युनिसिपल युनियनने घेतला आहे.

परिचारिका संवर्गाचे अनेक प्रश्न इंडियन नर्सिंग कौन्सिलच्या नियमाप्रमाणे व रुग्ण व परिचारिकांचे निकष लागू करणे, परिचारिका संवर्गाची रिक्त पदे भरणे, महिला नाभिकाचे पद निर्माण करून भरणे, परिचारिका शिक्षक संवर्गाची रिक्त पदे भरणे, असे अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यामध्ये नायर रुग्णालय प्रशासनाकडून अनास्था दाखवली जात आहे. आता कामाच्या वेळेत अचानक बदल केल्याने परिचारिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ द्यावी. तसेच चर्चा करून निर्णय होईपर्यंत दिलेल्या आदेशास स्थगिती द्यावी, अशी विनंती दि म्युनिसिपल युनियनच्या माध्यमातून रुग्णालय प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

आणखी वाचा-मुंबईतील २१ एकरांचा भूखंड अदाणींना गिफ्ट दिल्याचा वर्षा गायकवाड यांचा आरोप; म्हणाल्या, “कोट्यवधींची..”

नायर रुग्णालय प्रशासनाने परिचारिकांच्या प्रश्नांबाबत आजतागायत सकारात्मक भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे १६ जूनपर्यंत निर्णय न झाल्यास १७ जूनपासून सर्व परिचारिका आंदोलन पुकरातील. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, अशी माहिती दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nurses opposition to changes in working hours nurses of nair hospital are protesting from 17th june mumbai print news mrj