ठाकरे रुग्णालयातील रुग्णांच्या अंधत्वप्रकरणी तीन परिचारिका निलंबित, १० जणांच्या चौकशीचे आदेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर अंधत्व आल्याप्रकरणी रुग्णालयातील तीन परिचारिकांना निलंबित करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गुरुवारी दिले. अधिष्ठाता, मानद नेत्रतज्ज्ञांसह १० जणांच्या विभागीय चौकशीचे आदेशही आयुक्तांनी दिले.

मानद नेत्रतज्ज्ञांची सल्ला सेवा संपुष्टात आणून चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही सार्वजनिक रुग्णालयात सेवा देण्यास मनाई करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरमध्ये मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान सात जणांना जंतुसंसर्ग झाला. तीन जणांना अंधत्व आले आहे. कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अजोय मेहता यांनी दिले होते. मात्र डॉ. शिंदे यांनी थातूरमातूर चौकशी केल्याचे उघड झाले. त्यामुळे या प्रकरणाची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश अजोय मेहता यांनी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांना दिले होते. त्यानुसार आय. ए. कुंदन यांनी आयुक्तांकडे अहवाल सादर केला आहे.

मुख्य परिचारिका वीणा क्षीरसागर, परिचारिका समृद्धी साळुंखे आणि दीप्ती खेडेकर यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. रुग्णालयाचे रजिस्ट्रार डॉ. मोहम्मद साबिर, डॉ. कुशल काछा, मलमपट्टी करणारे अशोक कांबळे, अन्य कर्मचारी (कामगार) हितेश उमेश कुंडाईकर यांचीही विभागीय चौकशी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

मानद नेत्रतज्ज्ञ डॉ. अरुण चौधरी यांना ट्रामा केअरमधील नेत्र विभाग प्रमुखपदावरून हटविण्यात आले असून त्यांची सल्ला सेवा खंडित करण्यात आली आहे. चौकशी होईपर्यंत कोणत्याही सार्वजनिक रुग्णालयात सेवा देण्याची अनुमती देऊ नये असे सरकारला कळवावे, डॉ. चौधरी यांची नोंदणी रद्द करावी, शस्त्रक्रियेस मनाई करावी आणि निष्काळजीप्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, असे पालिका आयुक्तांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला सूचित केले आहे.

ट्रॉमा केअर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एस. बावा यांची विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणतीही जबाबदारी देऊ नये, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. अंधत्व आलेल्यांना द्यावी लागणारी नुकसानभरपाई आणि यातील दोषी आणि त्यांच्याविरुद्धची फौजदारी जबाबदारी निश्चित करावी. नेत्र शस्त्रक्रियागार वापराची मार्गदर्शकतत्त्वे (एसओपी) पुढील महिन्यात तयार करून सर्व पालिका रुग्णालयांत राबवावी, असे अजोय मेहता यांनी स्पष्ट केले.

डॉ. शिंदे यांचीही चौकशी

डॉ. गणेश शिंदे यांचीही विभागीय चौकशी करण्याचा आदेश अजोय मेहता यांनी दिला आहे. चौकशी आणि कारवाईत शिंदे यांनी निष्काळजीपणा दाखवला, चौकशी अहवालात गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे अशी व्यक्ती एका मोठय़ा सार्वजनिक रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी असावा का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे आदेश अजोय मेहता यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिले.