मुंबई : कुर्ला येथील मुंबई महानगरपालिकेच्या भाभा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला मारहाण झाल्याप्रकरणी गुरूवारी निदर्शने करण्यात आली. मात्र सुरक्षाविषयक मागण्यांचा गांभीर्याने विचार होत नसल्याने परिचारिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वंतत्र समिती नेमणे, तसेच असे प्रसंग पुन्हा घडू नयेत यासाठी नियमांची महिनाभरात अमलबजावणी करावी, अन्यथा सर्व महानगरपालिका रुग्णालयांतील परिचारिका काम बंद आंदोलन करतील, असा इशारा महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला भाभा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला गुरूवारी रात्री महिला रुग्ण व तिच्या कुटुंबियांनी मारहाण केली. रुग्णालयामध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून डॉक्टर व परिचारिकांवर वारंवार हल्ले होत आहेत. यावरून रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था कमकुवत असल्याचे स्पष्ट होते. तसेच यातून प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येतो, असा आरोप महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा…तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे मार्चचे वेतन रखडले
रुग्णालयातील कायमस्वरुपी सुरक्षा रक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येते. मात्र रुग्णांना भेटण्याची वेळ नियंत्रित केली जात नाही. एका रुग्णाला भेटण्यासाठी एकाच वेळी अनेक नातेवाईक कक्षात येतात. त्यामुळे रुग्ण कक्षात असलेल्या परिचारिकांना रुग्ण सेवेत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर कुर्ला भाभा रुग्णालयातील घडलेला प्रकार हा निषेधार्ह असून, त्याची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात यावी, तसेच संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
भाभा रुग्णालयात असे प्रसंग पुन्हा घडू नयेत यासाठी रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थापन बदलणे व त्या अनुषंगाने रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचे, वेळ निश्चित करण्याचे नियम सुरक्षा विभागाने तंतोतंत पाळणे आवश्यक आहे. तसेच हल्ला झालेल्या परिचारिकेचे उच्च अधिकाऱ्यांमार्फत समुपदेशन करणे आवश्यक आहे. रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सुचविण्यात आलेल्या या उपाययोजनांची एका महिन्यांत अमलबजावणी करावी, अन्यथा महानगरपालिका रुग्णालयांतील सर्व परिचारिका काम बंद आंदोलन करतील, असा इशारा महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड.प्रकाश देवदास यांनी दिला.
अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपआयुक्त (मनपा सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, सार्वजनिक आरोग्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह, महानगरपालिकेचे प्रमुख सुरक्षा अधिकारी यांना महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून यासंर्भातील पत्र देण्यात आले आहे.