मुंबई : राज्यातील ९२ नगरपालिका निवडणुकीत इतर मागासवर्ग समाजाला राजकीय आरक्षण लागू नसल्यानेच या समाजाला उमेदवारीत २७ टक्के प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू असे आश्वासनही पाटील यांनी दिले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय येणाऱ्या निवडणुका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये अशी पक्षाची भूमिका आहे. राज्य निवडणूक आयोगाने आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने उमेदवारी जाहीर करताना ओबीसी समाजातील २७ टक्के कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल.
पक्षाची आज बैठक: राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वसाधारण सभा मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ओबीसी आरक्षण, राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.