हिंदू धर्मातील वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी इतर मागासवर्गातील (ओबीसी) अनेक समाजघटकांच्या संघटनांनी एकत्र येऊन राज्यभर धर्मातर अभियान सुरू केले आहे. ‘आता ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर’ असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर २०१६ ला नागपूरमध्ये लाखोंच्या संख्येने ओबीसींच्या धर्मातरासाठी ही तयारी सुरू आहे. देशातील प्रत्येक राज्यात एक याप्रमाणे पुढील तीन वर्षांत अशा परिषदा घेण्याचे नियोजन आहे.
भारतीय समाजात संख्येने सर्वाधिक असलेल्या ओबीसी समाजाला स्वतची कसलीही ओळख नाही. हा समाज हिंदू धर्माचा एक भाग असला तरी, उच्चनीचतेच्या उतरंडीत त्याला खालचाच दर्जा दिला जातो. ओबीसींच्या नावाने करण्यात येणाऱ्या राजकारणाचा फायदा काही ठराविक नेत्यांनाच फक्त होतो. समाजाला त्याचा काहीच फायदा होत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह धर्मातर करुन बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतरच आंबेडकरी चळवळीला खऱ्या अर्थाने धार आली. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाला एक वेगळी ओळख मिळाली. बुद्धिवाद व विज्ञानवादाच्या अधिष्ठानावर संपूर्ण भारतीय समाजाची फेरउभारणी करण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न होता. तोच विचार स्वीकारण्याचा निर्णय ओबीसींनी घेतला असून धर्मातरापूर्वी या समाजात जागृती घडवून आणण्यासाठी राज्यभर अभियान सुरू केल्याची माहिती सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी दिली. धर्मातराचे अभियान सुरू करुन छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या प्रस्थापित राजकीय नेत्यांसमोर एक आव्हान उभे करण्याचाही त्यातून प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात आहे
६ जानेवारीला पुण्यात परिषद
या अभियानाला गेल्या वर्षी नागपूरपासून सुरुवात झाली. गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला मुंबईत दुसरी परिषद झाली. तिसरी परिषद ६ जानेवारीला पुण्यात होणार असून त्यात ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले व डॉ. आ. ह. साळुंखे उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद व कोल्हापूरलाही अशाच सभा घेण्यात येणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा