एकूण जागा आणि इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या पाहता ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी खुल्या वर्गापेक्षा ‘इतर मागासवर्गीय प्रवर्गा’तून (ओबीसी) प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येच मोठी चुरस असणार आहे.
आयआयटीतील सुमारे १० हजार जागांपैकी ५० टक्के जागांसाठी खुल्या वर्गातील मुले-मुली मिळून ५१ हजार १७० हजार विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छुक आहेत. पण, ओबीसींसाठी राखीव असलेल्या २७ टक्के कोटय़ातील जागांसाठी या प्रवर्गातील मुले-मुली मिळून तब्बल ४० हजार ८५ इतके विद्यार्थी स्पर्धेत आहेत. म्हणजेच खुल्या वर्गापेक्षाही ओबीसी कोटय़ातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये अधिक चुरस असणार आहे. प्रवेशेच्छुक मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत खूपच कमी आहे. उदाहरणार्थ खुल्या वर्गात मुलगे ४१ हजार ८८६ आहेत तर मुली केवळ ९ हजार २८४ आहेत. हेच प्रमाण अनुसूचित जातींमध्ये अनुक्रमे १५ हजार ९२९ आणि नऊ हजार २८४ असे आहे.
आयआयटीचे प्रवेश जेईई या एकाच लेखी परीक्षेच्या आधारे आतापर्यंत केले जात होते. पण, या वर्षीपासून आयआयटीच्या प्रवेश पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. नव्या पद्धतीनुसार आयआयटी प्रवेशासाठी मुख्य (मेन्स) आणि अ‍ॅडव्हान्स अशा दोन टप्प्यांवर परीक्षा घेण्यात येत आहेत. मुख्य परीक्षेत (एआयईईईच्या धर्तीवर होणारी) यशस्वी होणाऱ्या देशातील पहिल्या दीड लाख निवडक विद्यार्थ्यांची निवड दुसऱ्या टप्प्यासाठीच्या अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी करायची आणि या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी लावून प्रवेश करायचे असा हा नवा फाम्र्युला आहे. मात्र त्यासाठी त्या त्या शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत पहिल्या २० पर्सेटाईलमध्ये असणे विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. म्हणजे बारावीच्या गुणांनाही महत्त्व मिळेल आणि चाळणी परीक्षेतून निवडक विद्यार्थीच अ‍ॅडव्हान्सच्या कठीण टप्प्यासाठी पात्र ठरतील. त्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यासाठीची अ‍ॅडव्हान्स परीक्षा रविवारी पार पडली. दीड लाख विद्यार्थ्यांपैकी १ लाख २६ हजार विद्यार्थी देशभरातून या परीक्षेला सामोरे गेले. अ‍ॅडव्हान्ससाठी निवड झालेले सुमारे तब्बल २३ हजार ३०० विद्यार्थी या परीक्षेला बसले नव्हते. ‘यापैकी बहुतांश विद्यार्थी ओबीसींपैकीच आहेत.
गुजरात सरकारने राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई-मुख्य परीक्षेचे गुण ग्राह्य़ धरण्याचे ठरविले आहे. त्यामुळे, अ‍ॅडव्हान्ससाठी पात्र ठरलेले पण राज्यातच प्रवेश घेऊ इच्छिणारे गुजरातचे विद्यार्थी यातून आपोआप वगळले गेले,’ अशी माहिती दिल्लीचे जेईई-अ‍ॅडव्हान्सचे समन्वयक एच. सी. गुप्ता यांनी दिली.

अ‍ॅडव्हान्स परीक्षेला बसलेले प्रवर्गनिहाय विद्यार्थी
खुला वर्ग – ५१ ,१७०
अनुसूचित जाती – २०,०३०
अनुसूचित जमाती  – ८४१९
ओबीसी – ४० हजार ८५