मुंबई : युनिक आयडेंटिफीकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका प्रशासनाने येत्या १ ऑक्टोबरपासून अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांची हजेरी चेहरा पडताळणी (फेशिअल बायोमेट्रीक) यंत्राद्वारे करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी आवश्यक यंत्रे उपलब्ध करण्यात येत आहेत. अधिकारी, कर्मचारी व कामगारांना चेहरा पडताळणी उपस्थितीसाठी स्वयंनोंदणी करावी लागेल. शिक्षणाचा अभाव असलेल्या आणि स्वयंनोदणी करू न शकणाऱ्या कामगार वर्गाकडून त्यास विरोध होऊ लागला आहे.
मुंबई महानगरपालिका मुख्यालय आणि २४ विभाग कार्यालयांमध्ये एक लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. बहुसंख्य मुंबईकर विविध कामांसाठी पालिका मुख्यालय वा विभाग कार्यालयांमध्ये येत असतात. मात्र अनेक वेळा अधिकारी, कर्मचारी जागेवर उपस्थित नसतात. त्यामुळे नागरिकांना वारंवार खेटे घालावे लागत होते. तसेच कर्मचारी हजेरीपटावर स्वाक्षरी केल्यानंतर कार्यालयांतून गायब होत होते. यासाठी प्रशासनाने संगणकीय हजेरीची अंमलबजावणी केली. त्यासाठी महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्र बसविण्यात आली.
कार्यालयात आल्यानंतर आणि कार्यालयातून घरी जाण्यापूर्वी बायोमेट्रिक यंत्रावर नोंद करणे प्रत्येक कर्मचाऱ्याला बंधनकारक करण्यात आले. आता ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया’च्या निर्देशानुसार सध्या महापालिकेत कार्यरत असलेली यंत्रणा ३० सप्टेंबर २०२४ रोजी कालबाह्य होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी, कामगारांना हजेरी नोंदविण्यासाठी फेशिअल बायोमेट्रीक यंत्र उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वयंनोंदणी करावी लागणार
अधिकारी, कर्मचारी, कामगारांना चेहरा पडताळणी हजेरीसाठी स्वयंनोंदणी करावी लागणार आहे. अधिकारी, कर्मचारी कामगारांना https://bmc.face-attendance.in/face-registration या लिंकवर अथवा उपलब्ध करण्यात येणाऱ्या क्यूआर कोडवरून स्वयंनोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. स्वयंनोंदणी करताना कर्मचाऱ्याला संकेतांक, संपूर्ण नाव, लिंग, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, आधार क्रमांक, नोंदणीकृत स्थळ, पदनाम, खात्याचे नाव, नियुक्ती दिनांक, सेवानिवृत्ती दिनांक आदीची नोंद करावी लागणार आहे. प्रशासन दरबारी नोंद असलेल्या माहितीत चूक किंवा सुधारणा करावयाची असल्यास कर्मचाऱ्याला संबंधित आस्थापना विभागाशी संपर्क साधून आवश्यक बदल करावे लागणार आहेत. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला पुन्हा स्वयंनोंदणी करावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांना स्वयंनोंदणी केल्याची पोच संबंधित अधिकाऱ्याला सादर करावी लागणार आहे.
छायाचित्र बदलता येणार नाही
उपस्थिती नोंदवताना यंत्रावर कर्मचाऱ्याचा चेहरा दिसणार आहे. त्यामुळे यंत्रावर चेहऱ्याच्या छायाचित्राची नोंद करताना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. चेहऱ्यावर योग्य प्रकारे प्रकाश पडल्याची खात्री करून नोंदणी करावी लागणार आहे. एकदा नोंदणी झाल्यानंतर सदर छायाचित्र बदलता येणार नाही.
दोन कंत्राटदारांवर यंत्र पुरवठ्याची जबाबदारी
महानगरपालिकेच्या सर्व विभागात फेशिअल बायोमेट्रिक यंत्र बसविण्यास २३ ऑगस्ट २०२४ रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. महापालिकेच्या शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील संबंधित विभागांमध्ये एकूण १५०० चेहरा पडताळणी यंत्रे उपलब्ध करण्याचे काम दोन कंत्राटदारांना देण्यात आले आहे.
तीन नोंदणी केंद्रे
स्मार्टफोन नसलेल्या किंवा क्यूआर कोड वा लिंकद्वारे नोंदणी करणे शक्य नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी कंत्राटदारामार्फत शहरात पालिका मुख्यालयात, पूर्व उपनगरात घाटकोपरमधील जयंतीलाल वैष्णव मार्ग हिंदी शाळा आणि पश्चिम उपनगरातील पी-पूर्व विभाग कार्यालयात नोंदणी केंद्र उपलब्ध करण्यात येणार आहे. कार्यालयीन काम सांभाळून कर्मचाऱ्यांना संबंधित केंद्रावर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नोंदणी करता येणार आहे.
© The Indian Express (P) Ltd