नेहमीच्या वेळेपेक्षा महिनाभर अधिक रेंगाळलेल्या पावसाने निरोप घेताच घामाच्या धारांनी मुंबई-ठाणेकरांना भिजवण्यास सुरुवात केली आहे. पावसाची पाठ वळताच, ऑक्टोबरच्या कडक उष्म्याने प्रवेश केला असून गेल्या पाच दिवसांत मुंबईतील कमाल तापमानात तब्बल सहा अंशांची वाढ झाली आहे.
राजस्थानहून माघारी परतल्यावर मान्सूनने महाराष्ट्रातला मुक्काम लांबवला होता. त्यामुळे दरवर्षी धडकी भरवणाऱ्या ‘ऑक्टोबर हीट’च्या तडाख्यातून नागरिकांची अंशत: सुटका झाली होती. मात्र, आता दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता महाराष्ट्रातून मान्सून परतल्याचे वेधशाळेने शनिवारी जाहीर केले. मात्र, त्याआधीच गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत उकाडय़ाचा त्रास जाणवू लागला आहे. शनिवारी कुलाबा येथे ३६.२ अंश तर सांताक्रूझ येथे ३६.५ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली.
आता वाऱ्यांची दिशा बदलली असून ते ईशान्य दिशेकडून म्हणजे जमिनीवरून वाहायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तापमान वाढणार आहे. पुढील तीन ते चार दिवस तापमान चढेच राहणार आहे.
व्ही. के. राजीव, संचालक हवामानशास्त्र विभाग
मान्सूनचा माग : पुढील दोन ते तीन दिवसांत उर्वरित देशामधूनही मान्सूनचा पाऊस माघारी परतेल. मात्र २२ ऑक्टोबरच्या सुमारास तामिळनाडू, केरळ तसेच आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या काही भागांत ईशान्य मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे.
१९ ऑक्टो. – ३६.५
१८ ऑक्टो. – ३५. ३
१७ ऑक्टो. – ३३.१
१६ ऑक्टो. – ३२.२
१५ ऑक्टो. – ३०
१४ ऑक्टो. – ३०.९
(सांताक्रूझ वेधशाळेतील  नोंद)

सर्वाधिक तापमान
२०१२     ३५.९ (२९ ऑक्टो.)
२०११    ३६.३ (२८ ऑक्टो.)
२०१०    ३६ (२ ऑक्टो.)
२००९    ३६.८ (३० ऑक्टो.)
२००८    ३७ (१६ ऑक्टो.)
सर्वोच्च ३७.९ (२३ ऑक्टो.७२)