मुंबई : ओडिशामधील ‘सिमिलिपाल’ उद्यानाला अखेर राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला आहे. २४ एप्रिल २०२५ रोजी ओडिशा सरकारने अधिकृत अधिसूचना जारी करून सिमिलिपालला भारतातील १०७वे आणि ओडिशातील दुसरे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आहे. हे उद्यान ८४५.७० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले असून, हे ओडिशातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान ठरले आहे.
मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलिपाल दक्षिण आणि उत्तर वन विभागांतील ११ रेंजमध्ये हे उद्यान पसरले आहे. सिमिलिपाल हे भारतातील एकमेव ठिकाण आहे जिथे दुर्मिळ काळे वाघ (मेलॅनिस्टिक) आढळतात. येथे ५५ स्तनधारी प्रजाती, ३६१ पक्षी प्रजाती, ६२ सरपटणारे प्राणी आणि २१ उभयचर प्रजातींचा वावर आहे. सिमिलिपाल हे युनेस्कोच्या बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये समाविष्ट असून, प्रोजेक्ट टायगर आणि हत्ती राखीव क्षेत्राचा भाग आहे.
पार्श्वभूमी
सिमिलिपालला १९५९ मध्ये राखीव जंगल घोषित करण्यात आले. १९७९ मध्ये वन्यजीव अभयारण्य, १९८० मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, कोअर क्षेत्रात मानवी वस्ती असल्यामुळे ही प्रक्रिया अनेक दशकांपासून प्रलंबित होती. सरकारने सहा गावांपैकी पाच गावांचे पुनर्वसन केले असून, बकुआ गावातील ६१ कुटुंबे अद्याप त्या भागात वास्तव्यास आहेत.
स्थान आणि क्षेत्रफळ
सिमिलिपाल राष्ट्रीय उद्यान ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यात स्थित आहे. हे उद्यान ८४५.७० चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे. संपूर्ण सिमिलिपाल बायोस्फिअर रिझर्व्हचे क्षेत्रफळ ४,३७४ चौरस किलोमीटर आहे, ज्यामध्ये कोअर क्षेत्र (८४५ चौरस किलोमीटर), बफर क्षेत्र (२,१२९ चौरस किलोमीटर) आणि ट्रान्झिशन क्षेत्र (१,४०० चौरस किलोमीटर) यांचा समावेश आहे.
जैवविविधता आणि पर्यावरणीय वैशिष्ट्ये
• वनस्पती : सिमिलिपालमध्ये १,०७६ पेक्षा अधिक वनस्पती प्रजाती आढळतात, ज्यात ९४ प्रकारच्या ऑर्किड्सचा समावेश आहे. हे जंगल औषधी आणि सुगंधी वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे स्थानिक आदिवासी समाजाला उपजीविकेचा स्रोत मिळतो.
• प्राणी : येथे ४२ स्तनधारी, २३१ पक्षी, ३० सरपटणारे प्राणी आणि विविध उभयचर प्रजाती आढळतात. विशेषतः, सिमिलिपाल हे भारतातील काही निवडक ठिकाणांपैकी एक आहे जिथे काळ्या वाघांचे अस्तित्व आहे.
काळ्या वाघाची नोंद केव्हा?
१९९३ साली एका आदिवासी तरुणाने स्वसंरक्षणासाठी एका ‘मेलॅनिस्टिक’ वाघिणीला ठार मारल्याची नोंद आहे. त्यानंतर २००७ पर्यंत हे वाघ अधिकृतपणे व्याघ्रप्रकल्पात सापडले नाहीत. यानंतर २००७ मध्ये अधिकृतपणे या व्याघ्रप्रकल्पात ‘मेलॅनिस्टिक’ वाघ आढळला. त्यावेळी कॅमेरा ट्रॅपमध्ये तीन काळ्या वाघांचे छायाचित्र कैद झाले. त्यानंतर वाघांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले.
‘मेलॅनिस्टिक’ म्हणजे काय?
मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य सजीवांच्या त्वचेचा, केसांचा रंग ठरवण्यास कारणीभूत असते. ‘मेलॅनिन’चाच एक प्रकार म्हणजे ‘युमेलॅनीन’. प्राण्यांमध्ये ‘युमेलॅनीन’ हे रंगद्रव्य त्यांच्या काळ्या रंगाच्या त्वचेसाठी कारणीभूत ठरते. ‘इनब्रीडिंग’ म्हणजेच जवळच्या नात्यातील प्राण्यापासून होणारी प्रजोत्पत्ती. या साऱ्या गोष्टींचा परिणाम म्हणून दाट काळ्या रंगाचे पट्टे असलेल्या या वाघांची निर्मिती झाली आहे.पर्यटन आणि संरक्षणपर्यटन : सिमिलिपालमध्ये बरेहीपाणी आणि जोरांडा धबधबे, लुलुंग, सिटाकुंड आणि मेघासनी हे पर्यटनस्थळे आहेत. राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाल्यामुळे येथे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
संरक्षण : राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाल्यामुळे सिमिलिपालला वन्यजीव संरक्षणासाठी केंद्र सरकारकडून विशेष निधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जैवविविधतेचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करता येईल.
मुंबईतील नॅशनल पार्क कधी बनले राष्ट्रीय उद्यान?
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला (पूर्वीचे बोरिवली राष्ट्रीय उद्यान) १९८३ साली राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. या उद्यानाची सुरुवात ‘कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान’ या नावाने झाली होती. १९७४ साली याचे नाव बदलून ‘बोरिवली राष्ट्रीय उद्यान’ करण्यात आले. १९८१ साली संजय गांधी यांच्या स्मरणार्थ, या उद्यानाचे नाव ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ असे ठेवण्यात आले.
वैशिष्ट्ये
– उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ८७ चौरस किलोमीटर आहे .
– उद्यानात २,४०० वर्षे जुनी कान्हेरी लेणी आहेत.
– उद्यानात १,३०० हून अधिक वनस्पती प्रजाती आणि ५०० पेक्षा अधिक प्राणी प्रजाती आढळतात .
– हे उद्यान मुंबई शहराच्या हद्दीत स्थित असून, जगातील काही मोजक्या राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे.