मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने मंगळवारी सादर केलेल्या शिक्षणाच्या अर्थसंकल्पात नवनवीन योजना आणि प्रकल्पांच्या घोषणा केल्या. शाळेचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महापालिकेने आगामी वर्षात तंत्रज्ञान शिक्षणासंदर्भात स्टेम रोबोटिक्स, सायबर साक्षरता, विज्ञान पार्क, इंग्रजी भाषा प्रयोगशाळा उभारण्याचा संकल्प सोडला आहे. तसेच, पालिकेच्या शाळेतील स्वच्छतागृहांमध्ये तब्बल ५ हजार गंधवेध यंत्रे बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे.
महापालिका प्रशासनामार्फत भौतिक सुविधा, दर्जेदार शिक्षण व गुणवत्तापूर्ण उपक्रम या सर्वांची सांगड घालून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. महापालिकेच्या विविध माध्यमांच्या ९३८ प्राथमिक आणि १९१ माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. सध्यस्थितीत पालिकेमार्फत बालवाडीचे ९०० वर्ग, एमपीएसचे ११० वर्ग, सीबीएसई, आयसीएसई, आयबी व आयजीसीएसई मंडळाचे ९३ वर्ग असे एकूण ११०३ पूर्व प्राथमिक वर्ग सुरु आहेत. त्यात एकूण ४१ हजार ५८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांसाठी आगामी वर्षात नवनवीन योजना आणि प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. महानगरपालिकेच्या शहर विभागातील १०० व उपनगरातील ४०० शालेय इमारतींमध्ये स्वच्छतागृहांसाठी प्रत्येक इमारतीत १०० असे एकूण ५ हजार गंधवेध यंत्र बसवण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही यंत्रे हवेतील दुर्गंधी पसरवणारे घटक, तापमान, आद्रता यांची मोजणी करतात आणि त्याबाबतचा संदेश मोबाईल अॅपच्या माध्यमातून यंत्रणेला पाठवला जातो. त्यामुळे स्वच्छगातृहांमध्ये तातडीने साफसफाई करणे आवश्यक असल्यास ते वेळेत कळू शकते.
अद्ययावत प्रयोगशाळा
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत सखोल रुची निर्माण करणे, तसेच त्यांची विश्लेषणात्मक व सर्जनशील विचार करण्याची क्षमता सुधारण्यासाठी पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्टेम रोबोटिक्स प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी अर्थसंकल्पात एकूण १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सायबर साक्षरता प्रकल्पासाठी २३.६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी बालवाडी ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना पूरक आहार देण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तब्बल ११७.३७ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेच्या २ शालेय इमारतींमध्ये प्रायोगिक तत्वावर विज्ञान पार्क उभे करण्यात येणार आहे. तसेच, शालेय इमारतींमध्ये उपलब्ध असलेल्या संगणक प्रयोगशाळा, ई – वाचनालय व शैक्षणिक टॅब आदींसह एक नवीन स्वतंत्र इंग्रजी भाषा प्रयोगशाळा उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात १० कोटी रुपये निधी प्रस्तावित आहे. बहुतांश शाळांत बसविण्यात आलेले फळे जीर्ण झाल्यामुळे त्याजागी व्हाईट बोर्ड बसविण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. आगामी आर्थिक वर्षात आवश्यकतेनुसार व्हाईट बोर्ड खरेदी करण्यासाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्युत उपकरणांमध्ये कोणत्याही कारणाने ठिणगी पडल्यास तिचे आगीत रूपांतर होऊ नये यासाठी फायर कंट्रोल स्टिकर हे विद्युत उपकरण बसवले जाणार आहे. त्यामुळे ठिणगी पडताच ती तात्काळ विझविली जाईल. या उपकरणांच्या खरेदीसाठी ४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
आर्थिक साक्षरतेसाठी पुढाकार
महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता वाढीस लागावी यासाठी आगामी वर्षात आर्थिक साक्षरता मिशन राबविण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे. दैनंदिन आर्थिक व्यवहार, गुंतवणूक, विमा, कर्ज आणि व्याज या संकल्पनांवर आधारित अध्यापन साहित्य, क्षेत्रभेटी व प्रशिक्षण याद्वारे इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याचा अभिनव उपक्रम महापालिकेमार्फत राबवण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तब्बल १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
बोलक्या भिंतींसाठी १२ कोटींची तरतूद
विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील एखादी संकल्पना स्पष्ट करताना संबंधित आशयाचे चित्र दाखविल्यास त्यांना अध्यापनात मदत होते. यासाठी शालेय इमारतींच्या संरक्षक भिंतींवर आतल्या बाजूस शैक्षणिक, नैतिक मूल्ये व सामाजिक संदेश देणारी चित्रे रेखाटण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात १२.६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
व्याकरण आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन पुस्तकांची उपलब्धता महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेच्या लेखन कौशल्य व अस्खलित संभाषणासाठी व्याकरणाची गरज लक्षात घेऊन इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी व्याकरणाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी ३.५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावरच परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुस्तिका वितरित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात २७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.